महिलेची हत्या करुन मृतदेह फेकला झाडीत

03 May 2021 18:03:46
Murder _1  H x
 
पनवेलमधील घटना; अज्ञातावर गुन्हा दाखल
 
पनवेल । महिलेची हत्या करुन तिचा मृतदेह गोधडीत गुंडाळून पनवेल-उरण रेल्वे ट्रॅक शेजारील झाडीत फेकून दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अज्ञाताविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
बाबाराव पुंजाजी पाटील (रा. पारगांव, पनवेल) यांनी या घटनेची खबर पनवेल पोलिसांना दिली. ते 2 मे रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कुंडेवहाळ गावच्या हद्दीतील पनवेल-उरण रेल्वे ट्रॅक शेजारील सपाटीकरण केलेल्या जागेत काम पाहण्यासाठी गेले होते. काम करीत असताना त्यांना या जागेच्या बाजूला असलेल्या झाडीमध्ये प्रेत फेकल्याचे आढळून आले.
 
हे प्रेत एका गोधडीमध्ये गुंडाळून फेकण्यात आले होते. त्यांनी तातडीने याबाबत जागामालकाला कळवून पनवेल शहर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक घटनास्थळी दाखल होत, हे प्रेत झाडीमधून बाहेर काढण्यात आले.
 
मृत महिला ही 30 ते 35 वयोगटातील असून तिचे पाय बांधलेले होते. तसेच मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने तिची ओळख पटविण्यात अडचणी येत आहेत. अज्ञाताने तिची हत्या करुन हा मृतदेह गोधडीत बांधून झाडीत फेकल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे.
 
पनवेल शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञातावर हत्येचा व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ही महिला कोण आहे? तिला कोणी आणि का मारले? याचा शोध पोलीस घेत आहेत.
Powered By Sangraha 9.0