रोहा : गाड्यांच्या तोडफोडप्रकरणी 21 जणांविरोधात गुन्हे दाखल

By Raigad Times    03-May-2021
Total Views |
crime news_vehicle vandal
 
9 जणांना अटक; भंगाराच्या ठेक्यावरुन हाणामारी
 
रोहा : पोस्को कंपनीतील भंगार ठेका घेण्याच्या कारणावरुन दोन राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये रविवारी (2 मे) दुपारी तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये तलवार, लाठ्या काठ्यांचा वापर करत, गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी कोलाड पोलीस ठाण्यात दोन्ही गटांतील 21 जणांविरोधात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून 9 जणांना अटक करण्यात आली आहे.
 
विळे भागड एमआयडीसी क्षेत्रातील पोक्सो कंपनीत भंगार मालाचा ठेका घेण्यावरून शिवसेना व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. काही दिवसांपूर्वी हाणामारीचा प्रकारही घडला होता. दोन्ही गटात वाद धुमसत असताना रविवारी सुतारवाडी परिसरात एका फार्महाऊसवर एका गटातील कार्यकर्ते जमा झाले आहेत, अशी बातमी समजतातच दुसर्‍या गटातील कार्यकर्त्यांनी हातात तलवार, काठ्या, लाठ्या घेऊन एकमेकांवर दगडफेक तसेच बियरच्या बाटल्या फेकून हमला केला.
 
यातील एकाने हातात तलवार घेऊन फार्महाऊसच्या तसेच गेस्टच्या गाड्यांचा काचा व गाड्या फोडून काहींना जखमी केले. याप्रकरणी 12 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर परस्परविरोधी दुसर्‍या तक्रारीत गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादी व त्यांचे सहकारी चालक यांचा रस्ता अडवून त्याना ‘तुम्ही पोस्को कंपनीतून ट्रेलरमधून भंगारचा माल भरून घेऊन जायचे नाही, घेऊन गेलात तर तुम्हाला मारून तुमच्या गाड्याही जाळून टाकू’ अशी धमकी देऊन त्यांचे नुकसान केले. याप्रकरणी 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
या हाणामारी-तोडफोडप्रकरणी दोन्ही गटांतील 21 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यांतील 9 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे.