कौटुंबिक वाद विकोपाला! पत्नीची डोक्यात दगड घालून हत्या

29 May 2021 17:11:05
Crime Spot_Murder Spot_1&
 
  • रेवदंडा पोलिसात गुन्हा दाखल; पती अटकेत
  • रुग्णालयात मृतदेहाची हेळसांड...
अलिबाग/रेवदंडा । कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना साळाव येथील संजयनगर आदिवासीवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी खुनी पतीला रेवदंडा पोलिसांनी अटक केली आहे.
 
शुक्रवारी (28 मे) रात्री बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीत मुरुड तालुक्यातील बिर्ला मंदिराच्या बाजूला साळाव संजयनगर आदिवासी वाडी आहे. येथील भर वस्तीत राहणार्‍या संजय सुंदर वाघमारे आणि रत्ना संजय वाघमारे या दांम्पत्यामध्ये शुक्रवारी रात्री भांडण झाले.
 
हा वाद इतका विकोपाला गेला की संतापाच्या भरात संजयने पत्नी रत्नाच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली. रात्रीच्या सुमारास झालेल्या आरडाओरडीमुळे संजयनगर आदिवासीवाडी जागी झाली. ग्रामस्थांनी रेवदंडा पोलिसांशी संपर्क साध्ाून घटनेची माहिती दिली.
 
पोलीस निरीक्षक अशोक थोरात अन्य पोलीस सहकार्‍यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संजय सुंदर वाघमारे याला तात्काळ अटक केली. याप्रकरणी संजयनगर येथील राजू परशुराम वाघमारे यांच्या फिर्यादीवरुन रेवदंडा पोलीस ठाण्यात संजय वाघमारेविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
--------------------------------------------- 
रुग्णालयात मृतदेहाची हेळसांड
 
पोलिसांनी रत्ना वाघमारे हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात नेला. मात्र, येथे एमबीबीएस डॉक्टर नसल्याने तेथील डॉक्टरांनी मृतदेह अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यास सांगितले. परंतु अलिबागला पाठविताना प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरने सोबत शवविच्छेदनाबाबत पत्र देणे गरजेचे होते.
 
रेवदंडा पोलीस रत्नाचा मृतदेह घेऊन आज (29 मे) सकाळी 10 वाजता अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात आले. मात्र येथील डॉक्टरांनी हत्या असल्याने शवविच्छेदन करण्यास टाळाटाळ केली. अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के.डी. कोल्हे हेसुद्धा रुग्णालयात दाखल होऊन शवविच्छेदन करण्यास विनंती करीत होते. मात्र, डॉक्टरांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
 
अखेर वरिष्ठ आरोग्य अधिकारी यांच्याशी बोलल्यानंतर चार तासानंतर रत्ना यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. तोपर्यंत मृतदेह जिल्हा रुग्णालयाच्या आवारात रुग्णवाहिकेतच ठेवण्यात आला होता. यामध्ये मृतदेहाची हेळसांड तर झालीच, शिवाय पोलिसांनाही ताटकळत रहावे लागले.
Powered By Sangraha 9.0