सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी गुरव यांनी माऊंट एव्हरेस्ट शिखर केले सर

25 May 2021 15:56:43
Mount Everest_1 &nbs
 
नवी मुंबई पोलीस दलातून अभिनंदनाचा वर्षाव
 
पनवेल । नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी गुरव यांनी जगातील सर्वोच्च माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करुन महाराष्ट्र पोलीस दलाचा झेंडा फडकावला आहे. एव्हरेस्ट सर करणारे संभाजी गुरव हे महाराष्ट्र पोेलीस दलातील तिसरे अधिकारी आहेत.
 
गुरव यांनी केलेल्या या कामगिरीमुळे त्यांच्यावर नवी मुंबई पोलीस दलातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह व सह पोलीस आयुक्त डॉ.जय जाधव व इतर वरिष्ठ अधिकार्‍यांनीदेखील गुरव यांचे विशेष कौतुक केले आहे.
 
गुरव यांना प्रथमपासूनच गिर्यारोहणाची आवड होती. ती त्यांनी पोेलीस दलात भरती झाल्यानंतरही जोपासली. त्यांनी एव्हरेस्ट बेसकॅम्पची मोहीम पूर्ण केली होती. नंतर गेली दोन वर्षे सराव करुन अखेर एव्हरेस्ट शिखर सर केले. उणे 19 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान असलेल्या एव्हरेस्ट शिखरावर चढाई करताना गुरव यांनी काठमांडू येथून सुरुवात केली.
 
एव्हरेस्ट बेस कॅम्पचा 65 किलोमीटरचा टप्पा त्यांनी पूर्ण करत 17 मे रोजी कॅम्प-2 पर्यंत, 18 मे रोजी कॅम्प -3, 19 मे रोजी कॅम्प 54 आणि 20 मे रोजी कॅम्प-4 ते एव्हरेस्ट शिखर अशी चढाई सुरु केली. वातावरणाने साथ दिल्याने 23 मे रोजी त्यांनी एव्हरेस्ट शिखर सर केले.
 
यापूर्वी महाराष्ट्र पोेलीस दलातील आयपीएस सुहेल शर्मा, औरंगाबाद येथील पोेलीस कर्मचारी रफीक शेख यांनी एव्हरेस्ट सर करण्याची कामगिरी केली आहे. संभाजी गुरव यांनी यापूर्वी गडचिरोली येथे पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. व्यायाम आणि शारिरिक क्षमता राखण्यावर त्यांनी कायम भर दिला.
 
एक दिवस जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर करायचे ही त्यांची इच्छा होती. अनंत अडचणींचा सामना करत त्यांनी एव्हरेस्ट शिखर सर करुन एव्हरेस्टवीर हा मानाचा किताब पटकावल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
----------------------------------------------- 
2010 मध्ये पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून दाखल झाल्यानंतर संभाजी गुरव यांनी सुरुवातीची तीन वर्षे गडचिरोलीतील नक्षली भागात कमांडो-60 या फोर्समध्ये काम केले आहे. या फोर्समध्ये कार्यरत असताना डोंगरदर्‍यात दुर्गम भागात राहण्याची त्यांना सवय लागली. त्यानुसार शरीराचीदेखील क्षमता झाली.
 -----------------------------------------------
त्यानंतर डीवायएसपी असलेले भाऊ सूरज गुरव यांच्या सहकार्‍यांसोबत सह्याद्रीच्या कुशीतील गड-किल्ले चढण्याची त्यांना संधी मिळाली. त्यामुळे गिर्यारोहणाची आवड निर्माण झाल्याने संभाजी गुरव यांनी गिर्यारोहणाला सुरुवात केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी गुरव यांनी या मोहिमेपूर्वी 2017 मध्ये एव्हरेस्ट बेस कॅम्प (5300 मीटर) व 2018 मध्ये लडाखमधील स्टोक कांग्री शिखर (6150 मीटर) व त्यानंतर त्यांनी 2019 मध्ये नेपाळमधील (20 हजार 300 फूट) आयलंड पिक शिखर सर केले आहे.
Powered By Sangraha 9.0