आंबा व्यावसायिकाची साडेचार लाखांची फसवणूक

By Raigad Times    23-May-2021
Total Views |
Fraud_Cheating_Crime in C 
  • 900 डझन आंब्यांचा केला अपहार
  • कळंबोली पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल
पनवेल । कळंबोली वसाहतीमधून होलसेल आंब्यांची विक्री करणार्‍या एका व्यावसायिकाची जवळपास 4 लाख 40 हजारांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अज्ञात त्रिकूटावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
अनिकेत ब्रह्मदेव कन्हेरे यांचा होलसेल दरात आंबे विक्री करण्याचा व्यवसाय आहे. यासंदर्भात त्यांनी एका अ‍ॅपवर जाहिरात टाकली होती. त्या माध्यमातून 10 मे रोजी मुकेश पटेल नामक व्यक्तीने त्यांना 900 डझन आंब्याच्या 200 पेट्यांची ऑर्डर दिली होती. प्रत्येक पेटीचे 2200 रुपये ठरले होते.
 
त्यानुसार अनिकेत कन्हेरे हे 17 मे रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सदर माल घेऊन बोलेरो पिकअपने मुंबई येथील क्रॉफर्ड मार्केट येथे पोहोचविण्यास गेले होते. परंतु तेथे पावसाचे पाणी भरल्याचे सांगून पेट्या शिवडी-रे रोड येथील बीपीटी टोलनाक्याच्या पुढे आणण्यास त्यांना सांगण्यात आले. त्यानुसार अनिकेत यांनी सदर माल सलिम नावाच्या व्यक्तीच्या ताब्यात दिला व पैशांची मागणी केली.
 
त्यावेळी क्रॉफर्ड मार्केट येथील कार्यालयात जाऊन पैसे घेण्यास कन्हेरे यांना सांगण्यात आले. तसेच सलिमने अनिकेत यांच्यासोबत आणखी एका व्यक्तीला पाठवले होते. मात्र तिथे गेल्यानंतर मुकेश पटेल याचे ऑफिस नसल्याचे निदर्शनास आले. यावेळी अनिकेत कन्हेरे यांना त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
 
याबाबतची तक्रार त्यांनी कळंबोली पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर तीन जणांविरोधात अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.