रायगड : वडिलांना खांदा देण्यास मुलांचा नकार, ग्रामस्थांनीही फिरवली पाठ

By Raigad Times    02-May-2021
Total Views |
Funeral_1_1  H  
 
पोलीस, सर्कल, पत्रकार, रुग्णवाहिकेच्या चालकाने केला अंत्यविधी
 
म्हसळा । म्हसळा तालुक्यात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. कोरोना पॉझिटीव्ह असल्याच्या संशयावरुन मुलांनी मृत वडिलांना खांदा देण्यास नकार दिला. तर ग्रामस्थांनीही अंत्यविधीला मदत करण्यास नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अखेर पोलीस, पत्रकार, सर्कल, रुग्णवाहिका चालकाने विधीपूर्वक अंत्यसंस्कार पार पाडत माणुसकी जपली.
 
केलटे बौद्धवाडी येथील गोविंद कृष्णा जाधव (वय 76) यांचे 30 एप्रिल रोजी रात्री अचानक निधन झाले. त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी मुलांनी नकार दिला. गावकरीदेखील पुढे येईनात, त्यातल्या त्यात म्हणायला गावकर्‍यांनी म्हसळ्याचे मंडल अधिकारी दत्ता कर्चे यांच्याशी संपर्क साधून, प्रशासनापर्यंत ही माहिती पोहचवली.
 
कर्चे यांनी याबाबत प्रांताधिकारी अमित शेडगे यांना संपर्क साधून माहिती दिली. यानंतर तहसीलदार शरद गोसावी, सहायक पोलीस निरीक्षक सुर्वे यांच्या मार्गदर्शनाने मंडल अधिकारी कर्चे यांनी तातडीने पत्रकार निकेश कोकचा, पोलीस हवालदार संतोष जाधव, पोलीस नाईक सूर्यकांत जाधव, पोलीस शिपाई कदम, 108 रुग्णवाहिकेचे चालक शरद नांदगावकर व भरत चव्हाण यांना बोलावून घेतले.

Funeral_1_1  H  
 
केलटे बौद्धवाडी येथे गेल्यानंतर तिरडी बनविण्यापासून ते 2 किलोमीटर लांब स्मशानभूमीपर्यंत मयत खांद्यावर नेण्याचे काम या सर्वांनी केले आहे. अंत्यसंस्कार करुन प्रशासनाने त्यांची जबाबदारी चोख पार पाडली. मात्र कोरोनाच्या धसक्याने माणुसकी मेल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

Funeral_1_1  H  
 
दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्यांचा एक मुलगा कोरोना पॉझिटीव्ह आला होता. मात्र तो उपचारानंतर बरा होऊन घरी आला. असे असताना मृत पावलेल्या वडिलांचा कोरोनानेच मृत्यू झाला असेल या भीतीने त्यांचे मुलगे आणि गावकरी लांब राहिल्याचे बोलले जाते.