जिल्ह्यात तळा तालुक्यात कोरोनामुळे मृत्यूची टक्केवारी सर्वाधिक

By Raigad Times    15-May-2021
Total Views |
Tala Taluka Corona Update
तळा (विराज टिळक) । तळा तालुका आता पुन्हा एकदा जिल्ह्यात वेगळ्याच कारणाने पुढे आला आहे. शुक्रवार (14 मे) अहवालानुसार रायगड जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूची टक्केवारी तळा तालुक्यात सर्वाधिक असून, ती 6.90 इतकी आहे.
 
पनवेलसारख्या मोठ्या शहरात कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे आणि ती साहजिक आहे. लोकसंख्या जास्त म्हणजे रुग्णांचे प्रमाणही जास्तच असणार; पण पनवेलसारख्या मोठ्या शहरात कोरोनामुळे होणार्‍या मृत्यूची टक्केवारी खूप कमी आहे. ही टक्केवारी 14 मे रोजीच्या अवाहलाप्रमाणे 1.86 इतकी आहे. पनवेल शहरात 1 हजार 22 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 2 हजार 678 जणांनी आपले प्राण उपचारादरम्यान गमावले आहेत.
 
जिल्ह्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने लहान असलेला तळा तालुका पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण या तालुक्यात इतर तालुक्यांपेक्षा रुग्णाचे प्रमाण कमी असले, तरी रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे जवळपास 6.90 आहे. आतापर्यंत 275 रुग्णांपैकी 19 जणांनी आपले प्राण कोरोनामुळे गमावले आहेत.
 
तळा तालुक्यात रोजगार नसल्याने आणि शेती परवडत नसल्याने बहुतांश नागरिक किंवा अधिकारी बाजूच्या शहरात राहतात. नागरिक कमी राहूनसुद्धा आणि रुग्णसंख्या कमी असूनही तळ्याची कोरोनामुळे मृत्यूची टक्केवारी जिल्ह्यात सर्वात जास्त का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

Tala Taluka Corona Update