खोपोलीतील कोविड रुग्णालयासाठी चित्रलेखा पाटील यांच्याकडून मदतीचा हात

By Raigad Times    10-May-2021
Total Views |
khopoli covid hospital_1& 
 
6 लाखांच्या साहित्याची मदत
 
अलिबाग । सर्वपक्षीय नेत्यांच्या पुढाकाराने खोपोलीत उभ्या राहत असलेल्या कोविड रुग्णालयासाठी शेकापच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी बेड व ऑक्सिजन सेट असे 6 लाखांचे साहित्य या रुग्णालयात दिले आहे.
 
खालापूर तालुक्यातील रुग्णांची संख्या वाढत असताना उपचारासाठी रुग्णालय नसल्याने सर्वपक्षीय नेत्यांच्या पुढाकाराने खोपोलीतील केएमसी महाविद्यालयात कोविड रुग्णालय उभे राहत आहे. या रुग्णालयात गरीब आणि गरजू रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. रुग्णालयात साहित्याची कमतरता भासू नये, यासाठी केटीएसपी मंडळाचे अध्यक्ष तसेच शेकापचे नेते संतोष जंगम यांनी शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांच्याकडे मदतीसाठी पाठपुरावा केला होता. त्याला पाटील यांनी तात्काळ होकार देत बेड आणि ऑक्सिजन अशी मोठी मदत पाठवली आहे.
 
खोपोलीतील केएमसी महाविद्यालयात सर्वपक्षीय नेत्यांच्या प्रयत्नातून कोविड रुग्णालय उभे राहत आहे. पालकमंत्री अदिती तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र थोरवे यांनी या रुग्णालयासाठी शासन स्तरावरुन सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली आहे. कोरोना रुग्णांवर मोफत उपचार होणार असल्याने अनेक हात मदतीसाठी पुढे येत आहेत. खालापूर इंडस्ट्रियल असोसिएशनने डॉक्टर आणि कर्मचार्‍यांच्या मानधनाचा भार उचलण्याची तयारी यापूर्वीच दाखवली आहे.

khopoli covid hospital_1& 
 
शहरातील गगनगिरी आश्रम व्यवस्थापकांनी सुमारे 3 लाख रुपयांपर्यंतच्या विविध वस्तूरुपी मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. सामाजिक कार्यकर्त्या कांचन जाधव यांनी 29 हजारांचा धनादेश दिला आहे. अशा प्रकारे सर्व ठिकाणाहून मदत मिळत असतानाच आमदार जयंत पाटील यांच्या स्नुषा आणि शेकापच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी खोपोलीत उभ्या राहत असलेल्या कोविड रुग्णालयासाठी 20 बेड, सिलेंडरसह ऑक्सिजनचा सेट असे सुमारे 6 लाखांहून अधिक रकमेचे साहित्य पाठवले आहे. सध्या हे साहित्य बसविण्याचे काम प्रस्तावित रुग्णालयात सुरु आहे.
 
शेकापचे नेते संतोष जंगम यांनी हे साहित्य मिळावे, यासाठी पुढाकार घेतला होता. अशाप्रकारे मदत केल्याबद्दल शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांचे माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर, ज्येष्ठ नगरसेवक मोहन औसरमल, नवीनचंद्र घाटवळ यांनी आभार व्यक्त केले आहे. तसेच सर्व पक्षाच्या नेत्यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या गावात सुरु होत असलेल्या कोविड रुग्णालयाला मदत करण्याचे अवाहन केले आहे.