अ‍ॅप डाऊनलोड करायला सांगून महिलेला घातला गंडा

01 May 2021 19:09:53
cyber crime_fake call _1&
 
  • 69 हजारांची ऑनलाईन फसवणूक
  • खांदेश्वर पोलिसांत अज्ञात भामट्याविरोधात गुन्हा दाखल
पनवेल । वीज बिलासंदर्भातील तक्रारीचे निवारण करण्यासाठी अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगून 32 वर्षीय महिलेला 69 हजारांचा ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
विचुंबे-नवीन पनवेल येथे राहणार्‍या शिल्पा संदीप काळे यांनी मोबाईलवरुन वीज बिल भरले होते. सदरचे बिल एमएसईडीमध्ये भरले न जाता त्यांच्या बँक खात्यातून 1 हजार 70 रुपये रक्कम कमी झाली होती. सदरची रक्कम पाच ते दहा दिवसांत त्यांच्या खात्यात जमा होईल, असा मेसेज त्यांना आला होता. मात्र रक्कम खात्यात जमा न झाल्याने त्यांनी गुगल पे कस्टमर केअरचा नंबर प्राप्त केला व त्यांची तक्रार सांगितली.
 
त्यानंतर एका मोबाईल क्रमांकावरुन फोन आला. समोरुन त्यांना ‘कस्टमर केअर’मधून करणकुमार बोलत असल्याचे सांगून त्याने वीज बिलासंदर्भात असलेल्या तक्रारीबाबत शिल्पा यांना विचारणा केली. त्यावेळी तक्रारीचे निवारण करण्यासाठी त्याने शिल्पा यांना एनी डेस्क अ‍ॅप्लिकेशन मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यांनी तो अ‍ॅप डाऊनलोड केला.
 
त्यानंतर समोरील व्यक्तीने शिल्पा काळे यांना अ‍ॅप ओपन करण्यास सांगितला व मोबाईलवर आलेला एक कोड मोबाईलवरुन मागून घेतला. त्यानंतर शिल्पा यांना गुगल पे अकाऊंट ओपन करण्यास सांगितले. त्यांनी गुगल प्ले ओपन केले असता त्यांच्या अकाऊंटमधून 69 हजार 136 रुपये गायब झाले.
 
त्यामुळे शिल्पा काळे यांना त्यांची फसवणूक झाल्याची खात्री पटली. त्यांनी यासंदर्भात खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी अज्ञाताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरु आहे.
Powered By Sangraha 9.0