बदलापूर खरवई येथील तरुणाचा उल्हास नदीत बुडून मृत्यू

By Raigad Times    09-Apr-2021
Total Views |
karjat news_1  
 
कर्जत : बदलापूर येथील खरवई गावातील चार तरुण नेरळ जवळ उल्हास नदी येथे वाहत्या पाण्यात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी आले होते.मृत तरुणाचे नाव सुधीर अडागळे असून आज सकाळी स्थानिक आदिवासी तरुणांच्या मदतीने नेरळ पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने उल्हासनदी पात्रात शोध घेऊन मयत सुधीरचा मृतदेह पाण्याबाहेर काढला.
गुरुवार 8 एप्रिल रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बदलापूर येथील खरवई गावातील सुधीर अडागळे आणि त्याचे अन्य तीन साथीदार असे चार जण कर्जत तालुक्यातील नेरळ बोपेले येथील उल्हासनदी मध्ये पोहण्याचा आनंद घेण्यासाठी स्वतःच्या रिक्षाने आले होते.सोबत आणलेले वाहन बोपेले येथील आदिवासी वाडीच्या बाजूला उभे करून ते सर्व उल्हास नदीच्या पात्रा जवळ पोहण्यासाठी गेले होते.
 
वाहत्या पाण्यात उतरल्यानंतर त्या चार पैकी एक तरुण हा खोल पाण्यात उतरला होता,मात्र त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडणार असे वाटत असताना सुधीर अडागळे हा त्याला वाचवायला खोल पाण्यात पोहचला.आपल्या मित्राला सुखरूप बाहेर काढणारा सुधीर मात्र त्यावेळी त्या मित्रांना दिसला नाही.त्यामुळे तो कुठे दिसून येत नसल्याने मित्रांनी याबाबत स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांना या बाबत माहिती दिली.
घटना स्थळी नेरळ पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने नदीपात्रात शोध घेण्यास सुरुवात केली.परंतू सायंकाळी उशीरा पर्यंत सुधीर कुठेही सापडू शकला नाही.मात्र अंधार पडक्याने काळोखात सुधीर चा शोध घेणे कठीण झाल्याने पोलिसांनी शोध मोहीम थांबवली होती.आज 9 एप्रिल रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास सुधीरचा मृतदेह हा बुडाल्याच्या ठिकाणाहून काही अंतरावर पिंपलोली पुलाजवळ दिसून आला.त्या खोल पाण्यात कोल्हारे वाडीमधील आदिवासी तरुण तो मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोहचले.त्यातील शिवा वाघ या तरुणाने आपल्या मित्रांच्या साथीने आणि नेरळ पोलिसांच्या सुचनेने सुधीर अडागळे चा मृतदेह बाहेर काढला.
 
यावेळी अतिरिक्त उपविभागीय अधिकारी सुहास शिंदे , नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर,महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक तसेच पोलीस कर्मचारी मुनेश्वर,बागवे, पालवे आणि स्थानिक उपस्थित होते.