रायगडातील 1 लाख 35 हजार 716 नागरिकांनी घेतली कोरोनाची लस

By Raigad Times    08-Apr-2021
Total Views |
कोरोना लसीकरण_Corona Vacc
 
84 पैकी 25 लसीकरण केंद्रे लस नसल्यामुळे बंद
 
अलिबाग । रायगड जिल्ह्यात आजपर्यंत 1 लाख 35 हजार 716 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. यापैकी फक्त 117 लस घेतल्यानंतर किरकोळ त्रास जाणवल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील 84 लसीकरण केंद्रांपैकी 25 लसीकरण केंद्रे लस उपलब्ध नसल्यामुळे बंद आहेत.
 
शासनाकडून रायगड जिल्ह्यासाठी आतापर्यंत कोविशिल्ड लसचे 1 लाख 34 हजार 200 व कोव्हॅक्सिनचे 15 हजार 820 प्राप्त झाले आहेत. कोविशिल्डच्या लसींचे जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांकडे 28 हजार 280, शल्यचिकित्सकांकडे 34 हजार 370, पनवेल महानगरपालिका आयुक्तांकडे 48 हजार 500, खाजगी रुग्णालयांना 6 हजार 500, आर्मड् फोर्सेसना 3 हजार 950 असे वितरण झाले होते. तर कोव्हॅक्सिनच्या एकूण 15 हजार 820 लस प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे 9 हजार 820 तर पनवेल महानगरपालिकेकडे 6 हजार लस वितरित करण्यात आल्या

कोरोना लसीकरण_Corona Vacc 
 
आजपर्यंत एकूण 1 लाख 58 हजार 662 लाभार्थ्यांनी लसीकरणासाठी नोंद केली आहे. यामध्ये आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांची संख्या 22 हजार 506 असून यापैकी 18 हजार 567 जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर 7 हजार 099 जणांनी दुसरा डोस पूर्ण केला आहे. जिल्ह्यात 28 हजार 685 फ्रंटलाईन वर्कर्सनी नोंद केली होती. 17 हजार जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर 5 हजार 366 जणांनी दुसरा डोस पूर्ण केला आहे.

कोरोना लसीकरण_Corona Vacc
 
जिल्ह्यातील 45 वर्षांवरील 1 लाख 7 हजार 471 नागरिकांनी लसीकरणासाठी नोंद केली आहे. त्यापैकी 85 हजार 947 जणांनी पहिला डोस घेतला असून, 1 हजार 105 जणांनी दुसरा डोस पूर्ण केला आहे. अशाप्रकारे एकूण 1 लाख 35 हजार 716 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. आतापर्यंत लस घेतलेल्यांपैकी फक्त 117 जणांना किरकोळ त्रास जाणवला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. 

कोरोना लसीकरण_Corona Vacc 
 
जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भाग मिळून एकूण 45 कोविड सुविधा केंद्र सुरु आहेत. 2 हजार 331 विलगीकरण बेड तर 1 हजार 205 ऑक्सिजन उपलब्ध आहेत. जिल्ह्यात एकूण 171 व्हेंटिलेटर कार्यान्वित असल्याची माहितीही प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
 
दरम्यान, जिल्ह्यात आज (8 एप्रिल) पर्यंत एकूण 84 लसीकरण केंद्रांपैकी 59 लसीकरण केंद्रे कार्यान्वित आहेत. यापैकी 25 लसीकरण केंद्रे लस उपलब्ध नसल्याकारणामुळे तात्पुरती अकार्यान्वित झाली आहेत. लस उपलब्ध झाल्यानंतर ही लसीकरण केंद्रे पूर्ववत कार्यान्वित होतील, असेही सांगण्यात आले आहे.