कर्जाचे हप्ते, दुकानांचे भाडे, विजेचे बिल भरणार कसे? रायगडच्या व्यापार्‍यांचा सवाल.

08 Apr 2021 14:40:29
raigad news of lockdown 1
 
लॉकडाऊन शिथील करण्यासाठी अलिबाग, मुरुड, रोहा, महाड, पनवेल येथील व्यापार्‍यांची निदर्शने
 
अलिबाग : राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर त्याचे पडसाद छोट्या व्यापार्‍यांमध्ये उमटायला लागले आहेत. बुधवारी रायगड जिल्ह्यातील व्यापार्‍यांनी या लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे. कोरानाने मरु तेव्हा मरु पण; आधी कर्जाखाली आणि उपाशी मरायचं का? असा संतप्त सवाल व्यापार्‍यांनी उपस्थित केला आहे. लॉकडाऊन शिथील करण्यात यावे असे निवेदन रायगडच्या जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे.
 
कोरोनाचे रुग्ण वाढायला लागल्यामुळे राज्य सरकारने पुन्हा एकदा लॉकडाऊन केले आहे. गेल्या वर्षी आठ महिन्यांचे लॉकडाऊन झाले. याकाळात छोटे व्यापारी देशाधडीला लागले आहेत. अनेकांची कर्ज थकली आहेत. शॉपचे भाडे थकले, विज बिल, टेलीफोन बीले थकली. इतकेत कशाला घरी बसून कर्मचार्‍यांना पगारही देणे अशक्य झाले.
 
कालांतराने कोरोना रुग्णांचा आकडा घटू लागला. त्यामुळे लॉकडाऊनही सिथिल करण्यात आले. यानंतर गेल्या चार महिन्यात उसणं वारी करुन छोटे व्यापारी पुन्हा धंदे उभे करण्याचा प्रयत्न करत होते. अनेकांनी तर आपले धंदे बंद केले मात्र जे तग धरुन होते त्यांना दुसर्‍या लॉकडाऊनमुळे पुन्हा घरी बसण्याची वेळ आली आहे.
 
त्यामुळे अलिबाग, मुरुड, रोहा, तळा, म्हसळा, पनवेलसह अन्य शहरातील व्यापार्‍यांनी जोरदार विरोध केला आहे. याचे संतप्त पडसाद उमटू लागले आहेत. बुधवारी (7 एप्रील) अलिबागच्या व्यापार्‍यांनी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना भेटून लॉकडाऊन हटवण्याबाबत निवेदन आहे. मुरुड,महाडच्या व्यापार्‍यांनी स्थानिक प्रशासनाकडे आपली नाराजी व्यक्त केली आहे.
लॉकडाऊनमुळे या छोट्या व्यापार्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शॉपचे भाडे, कामगारांचे पगार, वीज बिले यामुळे छोटा व्यापारी मेटाकूटीला आला आहे. आता जर सरकारने असा नियम लागू केला तर बँकांचे हप्ते, नोकरांचे पगार कुणी द्यायचे हा प्रश्न उभा राहिला आहे.
 
कोरोना होऊन जीव नाही गेला तर कंगाल होऊन आत्महत्या करावी लागेल, त्यामुळे जीव गेला तरी दुकान बंद करणार नाही अशी भूमिका व्यापार्‍यांनी घेतली आहे. माझ्या व्यवसायावर माझे आणि कर्मचार्‍याच्या कुटूबाचेही पोट आहे त्यामुळे आता दुकान बंद करण्याचा निर्णय आम्ही मान्यच करू शकत नाही अशी टोकाची भूमिका व्यापार्‍यांनी घेतली आहे.
Powered By Sangraha 9.0