दिवेआगर येथील सुवर्ण गणेशाची लवकरच पुनःप्रतिष्ठापना

By Raigad Times    08-Apr-2021
Total Views |
diveaagar_1  H
 
गणेशाचा सुवर्ण मुखवटा बनवण्यास मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी
 
अलिबाग । दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मूर्तीच्या जप्त केलेल्या सोन्यातून पुन्हा अर्धमुखवटा तयार करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने दिली आहे. त्यामुळे सुवर्ण गणेश मूर्तीची लवकरच पुनःप्रतिष्ठापना होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
 
17 नोव्हेंबर 1997 साली दिवेआगर येथील द्रोपदी पाटील या महिलेला तिच्या वाडीमध्ये काम करत असताना एक तांब्याची जुनी पेटी सापडली होती. या पेटीत गणपतीचा सोन्याचा मुखवटा, कंठी आणि इतर सोन्याच्या वस्तू सापडल्या होत्या. तो दिवस संकष्टी चतुर्थीचा होता. त्यामुळे गणपतीच्या दर्शनासाठी रिघ लागू लागली. जमिनीत सापडलेल्या या सोन्याची मालकी नसल्यामुळे ते बेवारस असल्याचे सरकारकडून जाहीर करण्यात आले.
 
दिवेआगरमध्ये सोन्याचा गणपती प्रकटल्याची खबर दूरवर पसरली होती. त्यामुळे भाविकांची गर्दी रोज वाढत होती. हा गणेश मुखवटा गावातील गणेश मंदीरात ठेवण्यात आला होता. यानंतर मंदिर ट्रस्टने घेतलेल्या हमीच्या आधारे हा मुखवटा तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांनी गणेश मंदिरातच ठेवण्याचा निर्णय घेतला.
 
यानंतर 2012 सालापर्यंत सोन्याचा पावणारा गणपती म्हणून लोकांची श्रध्दा वाढली होती. राज्यभरातून गणेशभक्त येथे दर्शनासाठी येऊ लागले. त्यामुळे दिवेआगरचेही अर्थकारण बदलून गेले. पर्यटकनदृष्ट्या हे गाव बहरु लागले. मात्र 23 मार्च 2012 रोजी रात्री मोठे संकटच या गावावर पडले. गाव झोपी गेलेले असताना चोरट्यांनी मंदिरातून सुवर्ण गणेश मूर्ती चोरुन नेली.
 
दोन सुरक्षा रक्षकांची हत्या झाली झाली. अत्यंत खळबळजनक या घटनेमुळे महाराष्ट्र हादरुन गेला होता. पुढे पोलिसांनी या चोरट्यांना शोधून काढले. त्यांच्याकडून सोने जप्त करण्यात आले. मात्र त्यांनी ती मूर्ती वितळवून टाकल्यामुळे तिचे पूर्वीचे रुप नष्ट झाले होते. तो फक्त आता सोन्याचा गोळा राहिला होता. हे सोने परत मिळवून त्याची पुन्हा गणेशमूर्ती करण्यात यावी, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु होते.
 
सोन्याचा पुन्हा गणेश मुखवटा तयार करुन ते पुन्हा दिवेआगर येथील गणेश मंदिरात ठेवण्याची परवानगी मिळावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये सरकारच्यावतीने अर्ज दाखल करण्यात आला होता. अति.सरकारी वकिल श्रीकांत गावंड यांनी बाजू मांडली. त्यांची विनंती न्यायाधीश रेवती मोहिते-डेरे यांच्या कोर्टाने मान्य केली आहे. त्यामुळे सुवर्ण गणेश मूर्तीची पुनःप्रतिष्ठापना होणे शक्य होणार आहे.
 
दरम्यान, गणेश मंदिरात 9 वर्षांनंतर सुवर्ण गणेशाची पुनःप्रतिष्ठापना होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे दिवेआगरबरोबरच गणेश भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.