चक्रीवादळग्रस्त श्रीवर्धनमधील 6 गावे झाली वीजबिल थकबाकी मुक्त

By Raigad Times    08-Apr-2021
Total Views |
SHRIWARDHAN NEWS_1 &
 
अलिबाग - निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसलेल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत, श्रीवर्धन तालुक्याचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी श्रीवर्धन तालुकातील वीज ग्राहकांचा सिंहाचा वाटा आहे आणि अजून एक आदर्श या तालुक्याने आपल्या महाराष्ट्र समोर आणला आहे ते म्हणजे १०० टक्के वीजबिल थकबाकीमुक्त गावे ही मोहीम यशस्वी करून दाखवली आहेत . श्रीवर्धन तालुक्यातील तब्बल सहा गावे वीजबिल थकबाकी मुक्त झाली आहेत.
वाढलेल्या वीजबिल थकबाकीमुळे संकटात आलेल्या महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयातून दिलेल्या सूचना व उत्तम मार्गदर्शनामुळे संकटात आलेली महावितरण कंपनी वीज ग्राहकांच्या उत्तम प्रतिसादामुळे पूर्वपदावर येत आहे. श्रीवर्धन शहर व तालुक्यातील वीज ग्राहकांनी थकित वीज बिल भरण्यासाठी चांगले सहकार्य केले आणि महाराष्ट्रासमोर तालुक्यातील भोस्ते, वडघर,पांगळोली,सतीचीवाडी, बापवन व गालसुरेकाठी ही गावे वीज बिल थकबाकी मुक्त होऊन नवा आदर्श निर्माण केला आहे.
विशेष बाब म्हणजे घरगुती,वाणिज्य ,औद्योगिक श्रेणीतील थकबाकीमुक्ती मध्ये श्रीवर्धन तालुक्यातील या सहा गावांचा समावेश आहे. जानेवारी २०२१ ची थकीत रक्कम वडघर येथील १४२ ग्राहकांनी एकुण ५९ हजार ६८१ रुपये , भोस्ते येथील २८७ ग्राहकांनी १ लाख ९८ हजार ७२६ रुपये , पांगळोली येथील ७३ ग्राहकांनी २९ हजार ५२८ रुपये सतीचीवाडी येथील ६७ ग्राहकांनी २२ हजार ३८९ रुपये , गालसुरेकाठी येथील ५५ ग्राहकांनी ९८ हजार २९३ रुपये व बापवन येथील १३० ग्राहकांनी ४८ हजार ३७३ रुपये अशी एकूण ४ लाख ५६ हजार ९८९ रुपये पूर्णपणे थकबाकी भरून ही सहा गावे वीजबिल थकबाकी मुक्त झाली आहेत.
भांडुप परिमंडळाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांच्या व पेण मंडळाचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगाव विभागाचे कार्यकारी अभियंता आप्पासाहेब खांडेकर, गोरेगाव विभागाचे उपव्यवस्थापक निशिकांत धाईंजे यांनी विशेष मेहनत घेतली. श्रीवर्धन उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता महेंद्र वाकपैंजण,सहाय्यक अभियंता दिनेश गंगावणे,प्रधान तंत्रज्ञ विजय करंबत, वरिष्ठ तंत्रज्ञ ज्ञानेश्वर इंगोले,वरिष्ठ तंत्रज्ञ श्रीमती अर्चना कोमनाक यांनी या वीजबिल वसुली मोहिमेत विशेष सहकार्य केले.
वीजबिल थकबाकीमुक्त झाल्यामुळे भांडुप परिमंडळातर्फे या सर्व ग्राहकांचे अभिनंदन करण्यात आले. रायगड जिल्ह्यातील उर्वरित गावाच्या ग्राहकांनीसुद्धा आपले थकीत वीजबिल तसेच ग्रामपंचायतींनी त्यांच्या पथदिव्यांची थकबाकी भरून महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.