लॉकडाऊन सिथील करा ; तळा व्यापार्‍यांची मागणी

07 Apr 2021 20:14:31
tala news_1  H
 
कोरोनाने नाही , आम्ही उपासमारीने मरु: छोट्या व्यावसायीकांना भिती
विराज टिळक / तळा । लॉकडाऊनमुळे तळा शहरातील व्यापारी हैराण झाले आहेत. कर्जाचे डोंगर पुन्हा वाढण्याची भिती आहे. त्यामुळे लॉकडाऊन सिथिल नाही झाले तर कोरोनाने नाही तर उपाशी मरायची वेळ येईल अशी भिती व्यापारी व्यक्त करत आहे. तसे निवेदन व्यापार्‍यांनी नगरपंचायतीचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना दिले आहे.
 
तळा तालुका हा अतिशय दुर्गम तालुका म्हणून प्रख्यात आहे. रोजगारासाठी तरुणांनी मुंबई गाठली आणि आपलं गाव सोडलं. काही स्थानिक तरुणांनी बँके कडून कर्ज घेतले, काहींनी आपले घर बँकेत गहाण ठेवले आणि काहींनी तर शेती विकून लहान मोठे उद्योग तळा शहरात चालू केले. आधीच व्यवसाय कसेबसे चालत असताना एक वर्षांपूर्वी कोरोनाचे संकट संपूर्ण जगात आले. आणि शासनाने लॉकडाऊन जाहीर केले.
 
या शासनाच्या निर्णयाने याच व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली. कोरोनाचे संकटा असतानाच तळा शहराला 3 जून रोजी निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला आणि बंद असलेल्या दुकानांची छपरे उडून आतल्या मालाचे नुकसान झाले यावेळेस सरकारने अगदी न पुरेल अशी तुटपुंजी मदत केली आणि बुडत्याला काडीचा आधार असं समजत व्यावसायिकांनी मदत स्वीकारली.
 
कोरोना काळात जवळपास आठ महिने बंद असलेला व्यवसाय.... व्यवसाय बंद असल्याकारणाने याच व्यावसायिकांची घरचे, दुकानाचे वीजबिल थकले, टॅक्स थकले महत्वाचा मुद्दा म्हणजे बँकेचे सर्व हप्ते थकले. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच मार्च 2021 रोजी हे सर्व जण एक एक करून आपल्या बिळातून बाहेर आले आणि सर्व थकीत रक्कम अगदी व्याजासहित व्यापार्‍यांकडून वसूल केली. व्यापार्‍यांनी घरातील दागिने विकून, उसनवारी करून हि रक्कम जमा केली.
 
सरकारने ना वीजबिल माफ केले न बँकेचे हप्ते माफ केले. आता तेच संकट पुन्हा समोर येऊन ठेपले आहे. याच संकटाशी आता व्यापारी वर्ग लढा न देण्याच्या तयारी आहे. तळा शहरातील नाभिक संघटनेने सरकार कडे तर चक्क प्रसारमाध्यमांमार्फत सामूहिक आत्महत्येची मागणी केली आहे. आणि याच कारणाने आज काही तळा शहरातील व्यापार्‍यांनी त्यांच्या वरचे नियम शिथिल करून दुकाने खुली करून देण्याची मागणी तळा नगर पंचायत मुख्याधिकारी यांच्या कडे केली आहे.
 
व्यापार्‍यांचा सरकारने काहीतरी विचार करून आमची दुकाने सुरु करून द्यावीत आम्ही कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळू पण आता आम्ही बँकेला आणि महावितरण कंपनीला तोंड देऊ शकत नाही. दुकाने बंद असल्याने आम्ही आमचे पोट भरू शकत नाही तर या बाबतीत आमचा गांभीर्याने विचार करावा असे या निवेदनात म्हंटले आहे.
Powered By Sangraha 9.0