'ब्रेक दि चेन'ला पेण तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

By Raigad Times    06-Apr-2021
Total Views |
 pen news_1  H x
 
पेण : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्याकरिता महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या 'ब्रेक दि चेन'ला पेण तालुक्यातील व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
 
सोमवारी रात्री 8 वाजल्यापासून शासनाने कलम 144 जाहीर केल्यामुळे पेण तालुक्यातील नागरिकांनी घरा बाहेर न पडण्याचा निर्णय घेऊन शासनाच्या आदेशाला सकारात्मक साथ दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी विभा चव्हाण, पेणचे पोलिस निरीक्षक हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
 
पेण शहर व तालुक्यात शासनाने मंजुरी दिलेली औषधांची दुकाने, दूध डेरी, फळ व भाजी विक्रेते, मिठाईची दुकाने, बेकरी, डॉक्टरांचा दवाखाना, रुग्णालय, पॅथॉलॉजी लॅब, रिक्षा, विक्रम, मिनीडोर, औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या कामगारांची निर्माण करणाऱ्या कंपन्यांच्या गाड्या सुद्धा सुरू आहेत. राज्य परिवहन महामंडळाची एसटी सेवा सुरू आहे. त्याच बरोबर शिवभोजन सेवा व काही हॉटेल्स केवळ खाद्यपदार्थ पार्सल देण्याकरिता सुरू आहेत.याव्यतिरिक्त इतर सर्व प्रकारची दुकाने व सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत.
 
पेण तालुक्यातील डोलवी येथील जिंदाल स्टील वर्क्स (जेएसडब्ल्यू कंपनी) व तालुक्यातील इतर कंपन्याही सुरू आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता शासनाकडून कडक निर्बंध घालण्यात येतील असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी दिल्यामुळे अनेक नागरिकांनी लॉक डाऊन ची शक्यता समजून अगोदरच किराणा माल व इतर जीवनावश्यक वस्तूंची तयारी करून ठेवली आहे.
 
पेण नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अर्चना दिवे यांच्यासह पोलिस कर्मचारी व नगरपालिकेतील इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पेण शहरात ब्रेक दि चैन करण्याकरिता पेण शहरात फिरून व्यापारी व नागरिकांची जनजागृती केली.