माणगावमध्ये विनामास्क फिरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई

By Raigad Times    06-Apr-2021
Total Views |
Untitled-1_1  H 
                                                                                                                                                                file photo
                                                                                                                                                               
माणगाव(सलीम शेख) : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता शासनाने नागरिकांचे हित लक्षात घेऊन काही गोष्टींवर निर्बंध लादले असून नियम, अटी व शर्ती तयार केल्या आहेत. यांचे उल्लंघन करणाऱ्यांवर स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर कोणी दुकानदार नियमांची पायमल्ली करीत असेल त्यांच्यावर पोलीस गुन्हे दाखल करीत आहेत. माणगाव नगरीत बाजारपेठेत विनामास्क फिरणारे तसेच कोरोनाबाबतचे नियम धाब्यावर बसविणार्‍या नागरिकांवर, दुकानदारांवर माणगाव पोलीस व नगरपंचायत यांची करडी नजर आहे.
 
माणगाव शहरात तसेच तालुक्यातील विविध गावांतून गेल्या दीड महिन्यापासून सातत्याने कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. यावर मात करण्यासाठी प्रशासन जास्तीत जास्त प्रयत्नशील असून नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करीत आहेत. माणगाव बाजारपेठेत फिरताना मास्कचा वापर करा. हॉटेल व्यावसायिकांनी हॉटेल समोर सुरक्षित अंतरावर दोरी बांधून फक्त पार्सल देवून त्या ग्राहकाला तेथून लवकर जाण्यास सांगा. इतर दुकानदारांनाही आपल्या दुकानासमोर सुरक्षित दोरी बांधून मास्कचा वापर करून गर्दी होणार नाही याची काळजी घेणे जरुरीचे आहे.
 
हा विषाणू संसर्गजन्य असल्याने साऱ्यांनी या महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देवून सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. याबाबतीत कोणाचीच गय केली जाणार नाही. दिवसा पाच पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येवू नये. कारण जमावबंदी असून रात्री ८ नंतर संचारबंदी आहे. या सर्व गोष्टींचे पालन करणे नागरिकांना अनिवार्य आहे. अन्यथा रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या आदेशाने व माणगाव तालुक्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रविण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पोलीस तसेच माणगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायतीचे कर्मचारी यांची नियम धाब्यावर बसविणाऱ्यांवर करडी नजर आहे