पनवेलकरांना मालमत्ताकरात 40 ते 50 टक्के सूट मिळणार;महापौरांनी केल्या सूचना

By Raigad Times    06-Apr-2021
Total Views |
panvel mahanagarpalika_1&
 
पनवेल । पनवेल महापालिकेत विकास कामे करण्यासाठी आणि नागरिकांना सुविधा देण्यासाठी महापालिकेला कर लावणे आवश्यक आहे पण तो कर नागरिकांवर अन्याय कारक नसावा. वार्षिक भाडे मूल्य पन्नास टक्के कमी करून आणि इमारतींना घसारा लावून कर आकारावा. सिडको वसाहतीतील नागरिकांनी सिडकोला दिलेला सर्व्हिस टॅक्स कमी करून द्यावा असे मंगळवारच्या विशेष महासभेत महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी प्रशासनाला सांगितल्याने पनवेलकरांना मालमत्ताकरात 40 ते 50 टक्के सूट मिळणार आहे.
 
पनवेल महापालिकेची स्थापना 1 ओक्टोंबर 2016 रोजी झाली . त्यामध्ये पूर्वाश्रमीचे नगरपरिषदेचे क्षेत्र तसेच नव्याने समाविष्ट झालेल्या 23 ग्रामपंचायती (29 महसुली गावे ) व सिडको अंतर्गत क्षेत्राचा समावेश करण्यात आला. नव्याने समाविष्ट क्षेत्रातील मालमत्तांचे जीआयएस प्रणालीने सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यामध्ये नव्याने अंदाजे 2 लाख 46 हजार 185 इतक्या मालमत्ता आढळून आल्या आहेत. तसेच पूर्वाश्रमीच्या नगरपरिषद हद्दीतील 43 हजार 919 व पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायत हद्दीतील 30 हजार 319 अशा एकूण 3 लाख 20 हजार 823 मालमत्ताना कर आकारणी करण्यात येणार आहे.
 
महापालिकेने 31/3/2017 च्या सर्वसाधारण सभेतील प्रशासकीय ठराव क्रमांक 1 अन्वये वार्षिक भाडे मूल्य दर निश्चित करण्यात आले . सादर वाजवी वार्षिक भाडे मूल्य दर कमाल रुपये 624/- व किमान रुपये 343 /- प्रती चौ. मीटर प्रती वर्षी निश्चित करण्यात आले . त्यानुसार काही मालमत्तांची कर आकारणी करण्यात आली. त्यानंतर 17/1/2019 च्या सर्व साधारण सभेतील ठराव क्रमांक 118 पनवेल महापालिका हद्दीतील मालमत्ताना कर आकारणी करणे करिता करांचे दर निश्चित करणेकरिता मुंबई महानगर प्रादेशिक क्षेत्रातील महानगरपालिकांच्या कर दराचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 3/ 6/ 2019 रोजी समिती नेमण्यात आली. या समितीने महानगर पालिका क्षेत्राचे 8 विभाग ( नोड ) व 4 उपविभाग ( झोन ) मध्ये विभागणी करून वार्षिक भाडे मूल्य निश्चित केले. जीआयएस प्रणालीद्वारे सर्वेक्षण पूर्ण झालेल्या मालमत्ताना विशेष नोटीसा देऊन 21 दिवसात हरकती मागवण्यात होत्या.
 
पनवेल महापालिकेला 5 वर्ष पूर्ण झाल्यावर शासनाचे सहाय्यक अनुदान बंद होणार आहे महापालिकेच्या 110. 6 चौ.की.मी. क्षेत्रफला मध्ये नव्याने समाविष्ट झालेला अविकसित ग्रामीण भाग, महापालिकेची अद्याची आर्थिक स्थिति, आकृतीबंध मंजूर झाल्याने वेतनापोटी होणारा आस्थापना खर्च व शहर विकासासाठी आवश्यक असणारा विकास निधि मालमत्ता कारातून भागवण्यात येण्यासाठी मालमत्ताकर हे महापालिकेचे एक मुख्य उत्पन्नाचे स्त्रोत असल्याने याविषयावर चर्चा करण्यासाठी पनवेल महापालिकेची सोमवारी स्थगित झालेली विशेष सर्वसाधारण सभा आज (मंगळवार, दि. 6) ऑनलाइन पध्दतीने झाली . यावेळी सभागृहात महापौर डॉक्टर कविता चौतमोल, उपमहापौर जगदीश गायकवाड, उपायुक्त संजय शिंदे आणि नगर सचिव उपस्थित होते.
 
महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी आज सभागृहात प्रभागवार प्रत्येक सदस्यांना बोलण्यास संधि दिली. सभागृह नेते परेश ठाकुर यांनी यावेळी पनवेल महापालिकेत समाविष्ट झालेल्या ग्रामपंचायती मधील गावातील कर पाच वर्ष वाढणार नाही असे आम्ही निवडणुकीच्यावेळी आश्वासन दिले होते. ते पूर्ण करण्याला भारतीय जनता पक्ष बांधील असल्याचे सांगून शेजारील नवीन मुंबई महापालिकेपेक्षा येथील सेवा व सुविधा कमी धर्तीच्या आहेत. त्यामुळे येथील वार्षिक मूल्य कमी असावे अशी आमची व जनतेची रास्त मागणी आहे. महापालिकेच्या विकासासाठी कर आकारावा पण त्याचे प्रमाण अवाजवी असू नये यासाठी प्रशासना बरोबर अनेक वेळा केलेल्या वाटाघाटीचे फलित म्हणजे ही विशेष सभा असल्याचे म्हटले आहे.
 
प्रस्तावित वार्षिक भाडे मूल्य कमी करावे. भाड्याने दिलेल्या वाणिज्य किवा निवासी सदांनीकांना कर हा सर्वसामान्य कराच्या दीडपट असावा.इमारतीमधील लॉबी व करिडोरला आकरण्यात आलेला कर रद्द करावा किवा निवासी दराच्या 1/4 करावा. सोसायटी ऑफिस, सुरक्षा रक्षक केबिन मल्टीपर्पाज हॉल, स्विमिंग पूल यासाठी निवासी कारच्या 1/4 कर आकरण्यात यावा. कराची आकारणी 1/7/2019 पासून करावी त्यावर व्याज व शास्ति आकारू नये. महापालिका 1/10/2016 पासून मालमत्ताकर वसूल करणार असल्याने सिडकोने घेतलले शुल्क परत द्यावे किवा ती मालमत्ताकरात वर्ग करावी यासाठी सर्व साधारण सभेत ठराव आणावा अशी मागणी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केली.
 
यावेळी अड मनोज भुजबळ यांनी नवीन पनवेल मध्ये महापालिका कोणत्याही सुविधा देत नाही. सिडको सर्व्हिस टॅक्स वसूल करते त्यामुळे तेथील नागरिकांना दोनदा कर भरावा लागेल. याशिवाय झोन पाडताना प्रशासनाने 12 फुट रस्त्याचा विचार करताना त्याच्या एका बाजूला झोपड पट्टी किवा अल्प उत्पन्न गटातील लोकांची घरे आहेत याचा विचार केला नसल्याचे निदर्शनास आणून दिले. नगरसेविका चारुशीला घरत यांनी भाडे मुल्य अवाजवी असल्याचे सांगून कमी करावे. ग्रामीण प्रत्येक गावाला वेगळा दर लावणे योग्य नाही सगळ्यांना एक सारखे भाडे मूल्य लावण्याची मागणी केली. मागणी तेजस कांडपिळे यांनी काळूंद्रे गावात ग्रामपंचायत होती. त्यामुळे सिडको नोड बरोबर त्याची तुलना करून चालणार नाही कारण त्या ठिकाणी सिडकोने कोणत्याही सुविधा पुरवलेल्या नाहीत. पाणी, गटार यासारख्या मूलभूत सुविधा देखील दिलेल्या नाहीत. त्यामुळे महापालिकेत समाविष्ट झालेल्या इतर ग्रामपंचायती प्रमाणेच तेथे दर लावण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली
 
आपल्याला शक्य असेल तर मालमत्ता कर 2020 -21 पासून घ्यावा किवा किमान ग्रामीण भागाला ज्या प्रमाणे आपण टप्प्याटप्प्याने कर वाढवतो त्या पध्दतीने कर आकारणी करावी सिडको भागात आपण पाणी पुरवत नसताना पाणी कर कशासाठी वसूल करावा बिला मधील चुका त्वरित दुरुस्त कराव्यात कारण त्यामुळे जनतेच्या भावना तीव्र होत आहेत. सिडकोने घेतलेल्या सर्व्हिस टॅक्सची तेथील नागरिकांना सूट द्यावी. सिडकोशी संघर्ष करण्यास आम्ही तयार आहोत असे विक्रांत पाटील यांनी सांगितले . यावेळी उप महापौर जगदीश गायकवाड , नगरसेवक बबन मुकादम, प्रवीण पाटील, शत्रुघ्न काकडे, अरविंद म्हात्रे, मनोहर म्हात्रे , अजय बहिरा, एकनाथ गायकवाड, महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, हेमलता म्हात्रे, वृषाली वाघमारे, राजश्री वावेकर , दर्शना भोईर, विद्या गायकवाड, संतोषी तुपे यांनी चर्चेत भाग घेतला. विरोधी पक्ष नेत्यांनी मालमत्ता करा विषयी मुद्दे मांडण्यापेक्षा आपल्या सदस्यांनी सोमवारी विशेष सर्वसाधारण सभेत घातलेल्या गोंधळाचे समर्थन करण्यातच सभागृहाचा मौल्यवान वेळ वाया घालवला.
“पनवेल महापालिकेत विकास कामे करण्यासाठी आणि नागरिकांना सुविधा देण्यासाठी महापालिकेला कर लावणे आवश्यक असते. प्रशासानाने महापालिकेच्या अधिनियमा प्रमाणे कर लावावा पण हा कर  नागरिकांवर अन्याय कारक नसावा. प्रशासनाने वार्षिक भाडे मुल्यावर कर आकारणी करताना चुकीच्या पध्दतीने केली असल्याचे दिसून येत असल्याने त्यावर चर्चा करण्यासाठी आजची महासभा बोलवण्यात आली होती आपण वार्षिक भाडे मूल्य पन्नास टक्के कमी करून आणि इमारतींना घसारा लावण्यास सांगितल्याने नवी मुंबई पेक्षा आपला मालमत्ता कर कमी होईल. - डॉ. कविता चौतमोल- महापौर”