पनवेल : पोलीस-व्यापाऱ्यांमध्ये बाचाबाची

By Raigad Times    06-Apr-2021
Total Views |
protest against lockdown_
 
  • खारघरमध्ये दुकाने बंद करायला आलेल्या पोलिसांची गाडी अडवली
  • कळंबोली प्रभाग कार्यालया समोरही ठिय्या आंदोलन
  • लाॅकडाऊनविरोधात व्यापाऱ्यांचा प्रक्षोभ
पनवेल । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने महिनाभर कडक निर्बंध लावले आहेत. त्यामुळे पनवेल परिसरातील दुकाने आज (6 एप्रिल) बंद करण्यात आली. याविरोधात व्यापारी, दुकानदारांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. खारघर वसाहतीत संतप्त दुकानदारांनी पोलिसांची गाडी अडवली. तर कळंबोलीत प्रभाग कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करुन निर्बंधाविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली.
 
कोरोना विषाणूंचे संक्रमण वाढत चालले आहे. विशेषतः महानगरात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने कडक पावले उचलली आहेत. त्यानुसार काही निर्बंध लावण्यात आले असून मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. शनिवार आणि रविवारी पूर्ण टाळेबंदी करण्यात आली आहे. इतर दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. याबाबत मार्गदर्शक तत्त्वे राज्य सरकारने जाहीर केली आहेत.

protest against lockdown_ 
 
या आदेशाची पनवेल परिसरात आजपासून कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार खारघर परिसरातील दुकाने पोलिसांनी बंद केली. ठिकठिकाणी जाऊन दुकानदार, व्यावसायिकांना त्यांनी आवाहन केले. अन्यथा कारवाईचा इशारा दिला. एक महिना दुकाने व व्यवसाय बंद राहणार असल्याने मोठ्या आर्थिक नुकसानीला दुकानदार, व्यापारी, व्यावसायिकांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

protest against lockdown_ 
 
संतप्त दुकानदार, व्यापार्‍यांनी खारघरमध्ये पोलिसांची गाडी अडवली व दुकाने बंद करण्यास विरोध दर्शवला. पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. सरकारने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी पोलीस यंत्रणा करत असल्याची जाणीव संबंधितांना करुन देण्यात आली. कळंबोली वसाहतीतही दुकाने बंद करण्यात आली. त्यामुळे काही व्यापार्‍यांनी महानगरपालिकेच्या प्रभाग कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करुन निदर्शने केली.