कळंबोलीकरांना मिळणार अल्ट्रा मॉडर्न गार्डन

06 Apr 2021 14:36:27
 panvel kalamboli news_1&n
 
पनवेल महानगरपालिका सुशोभीकरण करणार
 
2.2 कोटी रुपयांच्या निधीला हिरवा कंदील
 
पनवेल । कळंबोली वसाहतीतील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असणार्‍या सेक्टर 2 येथील उदयानाचा कायापालट करण्यात येणार आहे. महिला व बालकल्याण सभापती मोनिका प्रकाश महानवर यांच्या पाठपुराव्याची दखल घेत येथे अल्ट्रा मॉडर्न गार्डन विकसित करण्यात येणार आहे. यासाठी 2.2 कोटी रुपयाच्या निधीला हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे कळंबोलीकरांना विरंगुळ्यासाठी सुशोभित जागा उपलब्ध होणार आहे.
 
सिडकोने सर्वात अगोदर नवीन पनवेल आणि कळंबोली वसाहतीचा विकास केला. वसाहती निर्माण करीत असताना याठिकाणी उद्यानासाठी आरक्षित भूखंड ठेवण्यात आले. येथे उद्यान सुद्धा विकसित करण्यात आले. त्यांची देखभाल आणि डागडुजीकडे फारसे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे अनेक उद्यानांची दुरावस्था झालेली आहे. या ठिकाणी नागरिकांसाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याचे दिसून येते. कळंबोली चा विचार करत असताना स्मृति गार्डन आणि सेक्टर 2 येथील उद्यान हे काही प्रमाणामध्ये प्रशस्त आहेत.
 
बारा वर्षांपूर्वी या उद्यानाचे सुशोभीकरण करण्यात आले. परंतु त्याच्या देखभालीकडे सिडकोने फारसे लक्ष दिले नाही. परिणामी या ठिकाणी प्रचंड प्रमाणात दुरवस्था झालेली आहे. आत मध्ये विकसित करण्यात आलेले कारंजे धूळ खात पडून आहेत. अनेक दिवे बंद अवस्थेत आहेत. येथील अ‍ॅम्पी थिअटरचा वापर होताना दिसत नाही. सार्वजनिक शौचालयांची दुरावस्था आहे.
 
पाण्याचा पूर्णपणे अभाव दिसून येतो. लॉन सुद्धा सुस्थितीत नाहीत. लहान मुलांना खेळण्यासाठी अपुर्‍या खेळण्या आहेत. त्यात निसर्ग चक्रीवादळामुळे अनेक झाड उन्मळून पडलेत. अंतर्गत स्वच्छतेकडे फारसे लक्ष दिले जात नाही. या सर्व गोष्टींमुळे सेक्टर 2 च्या उदयानाला अक्षरशा अवकळा आलेली आहे. हे गार्डन सिडकोने पनवेल महानगरपालिकेकडे वर्ग गेल्यानंतर त्याचे सुशोभिकरण करण्यात यावे अशी मागणी महिला व बालकल्याण सभापती मोनिका प्रकाश महानवर यांनी महापालिकेकडे केली होती. त्यानुसार मनपाने दोन कोटी रूपयां पेक्षा जास्त निधीला मंजुरी दिली आहे.
 
या सुविधा प्रस्तावित
 
हे उद्यान विकसित करीत असताना येथे ओपन जिम, व्यायाम करण्यासाठी तालीम, विविध कार्यक्रमांसाठी अ‍ॅम्पी थिएटर,कॅपेरिया, याठिकाणी येणार्‍यांसाठी रेस्टॉरंटची सोय प्रस्तावित आहे. त्याचबरोबर उत्तम पद्धतीचा लॉन, प्रशस्त चिल्ड्रन पार्क, वेगळ्या प्रकारचा गार्डनिंग, वॉकिंग करण्यासाठी पाथ-वे, सार्वजनिक स्वच्छतागृह या सुविधा येथे करण्याचा प्रस्ताव आहे.
Powered By Sangraha 9.0