पेण : लाच स्वीकारताना वकीलाला रंगेहाथ पकडले; लिपीक फरार

By Raigad Times    30-Apr-2021
Total Views |
Corruption_ACB Raigad_1&n
 
  • रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
  • दाव्याचा निकाल बाजूने लावण्यासाठी स्वीकारली लाच
पेण । पेण उपविभागीय अधिकारी कार्यालयातील प्रलंबित दाव्याचा निकाल बाजूने लावण्यासाठी 80 हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी एका वकिलाला रंगेहाथ पकडण्यात रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला यश आले आहे. तर लाच मागणारा लिपिक फरार असून, त्याचा शोध सुरु आहे.
 
आज (30 एप्रिल) दुपारी पाऊण वाजण्याच्या सुमारास सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. 59 वर्षीय तक्रारदार यांच्या कोलेटी येथील जमिनीबाबत पेण उपविभागीय अधिकारी कार्यालयात दावा प्रलंबित होता. या दाव्याचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने देण्याकरिता कार्यालयातील लिपिक जितेंद्र अनंतराव दाभोळे याने 80 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तसेच लाचेची रक्कम त्याने अ‍ॅड.मनिष म्हात्रे याच्याकडे देण्यास सांगितली होती.
 
यासंदर्भात तक्रारदाराने रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर आज (30 एप्रिल) सापळा रचण्यात आला. दुपारी पाऊण वाजण्याच्या सुमारास लिपिक दाभोळे याने मागणी केल्याप्रमाणे तक्रारदाराकडून 80 हजार रुपयांची लाच स्वीकारताना अ‍ॅड.मनिष म्हात्रे याला रंगेहाथ पकडण्यात आले. तर लिपीक दाभोळे हा फरार असून, त्याचा शोध सुरु आहे.
 
रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक सुषमा सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, पोलीस हवालदार मोरे, गंभीर, महेश पाटील, पोलीस नाईक मगर, सूरज पाटील, महिला पोलीस नाईक स्वप्नाली पाटील यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
----------------------------------------
लाच मागितली तर येथे करा तक्रार...
कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्यावतीने खाजगी इसम (एजंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास ‘अँटी करप्शन ब्युरो, रायगड’ येथे 02141-222331 या दूरध्वनी किंवा 9702706333 या मोबाईल क्रमांकावर किंवा 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना केले आहे.
------------------------------------------