सुधागड तालुक्यात कोरोना लसीकरण केंद्र वाढवा

30 Apr 2021 16:02:30
MNS_1  H x W: 0
 
मनसेची मागणी; तहसीलदारांना निवेदन
 
पाली/बेणसे । सुधागड तालुक्यात लसीकरणासाठी नागरिकांची फरफट होत आहे. येथील लोकसंख्येच्या तुलनेत असलेली केवळ दोन लसीकरण केंद्र अपुरी पडत आहेत. त्यामुळे येथील कोरोना लसीकरण केंद्र वाढविण्याची महत्वपूर्ण मागणी सुधागड तालुका मनसेने केली आहे.
 
यासंदर्भात तहसीलदार दिलीप रायन्नावार यांना आज (30 एप्रिल) निवेदन देण्यात आले आहे. सुधागड तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोय. रुग्णांच्या मृत्यूचे वाढते प्रमाणही चिंताजनक बनले आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र लसीकरण सुरू आहे, मात्र नागरिकांना ही लस मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागतेय. लसीकरण प्रक्रियेदरम्यान अपुरे नियोजन व ढिसाळ व्यवस्थापन असल्याने नागरिकांना याचा फटका बसत आहे.
 
जांभूळपाडा व पाली या दोनच केंद्रावर कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु आहे. सुधागड तालुक्याच्या लोकसंख्येच्या मानाने ही लसीकरण केंद्र अपुरी पडत आहेत. सध्या दोन्ही केंद्रांची परिस्थिती पाहता, या ठिकाणी नागरिकांची गर्दी उसळत आहे. लसीकरणासाठी आवश्यक असलेले टोकन मिळवणे मोठे कठीण काम झाले आहे. नागरिकांना यासाठी तासनतास ताटकळत रांगेत उभे रहावे लागते. यात जेष्ठ नागरिक व अपंग नागरिकांना त्रास होत आहे.
 
नागरिकांची लस मिळविताना केविलवाणी धडपड पहायला मिळत आहे. याचा गांभीर्याने विचार करुन, लसीकरण केंद्र वाढवून लोकांना दिलासा देण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. यावेळी मनसेचे सुधागड तालुका अध्यक्ष सुनील साठे, उपाध्यक्ष मंगेश ठोंबरे, विभाग अध्यक्ष केवळ चव्हाण आदी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0