रायगड जिल्हांतर्गत रस्त्यांसाठी गडकरींकडून 44.94 कोटींची तरतूद

By Raigad Times    27-Apr-2021
Total Views |
Nitin Gadkari_1 &nbs
 
रेवदंडा पुलासाठी 4 कोटी 75 लाखांचा निधी
केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची माहिती
 
अलिबाग । सीआरआयएफ अंतर्गत रस्ते बांधणी प्रकल्पासाठी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी रायगड जिल्ह्यासाठी 44 कोटी 94 लाख रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये अलिबाग-मुरुडला जोडणार्‍या रेवदंडा पुलाचाही समावेश आहे. या पुलाच्या कामासाठी 4 कोटी 75 लाखाचा निधीची तरतूद करण्यात आली आहे.
 
नितीन गडकरी यांच्या कार्यालयाकडून राज्यातील प्रकल्पांची माहिती देण्यात आली आहे. यात रायगड जिल्ह्यातील आंबेत-बागमांडला (राज्य महामार्ग-100) रस्त्याच्या सुधारणेच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. याकरिता 3 कोटी 92 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
 
अलिबाग तालुक्यातील अलिबाग-रेवदंडा (राज्य महामार्ग-4) या रस्त्यावरील पुलाच्या बांधकामाला मंजुरी देण्यात आली असून, त्याकरिता 4.75 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. महाड तालुक्यातील भावे-किये-पडवी-रायचा कोंड रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी 5.91 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
 
कर्जत तालुक्यातील पळसदरी स्थानक ते पळसदरी आवळस-मोहिली-बिड-कोंदीवडे (मुख्य जिल्हा मार्ग-105) रस्त्याच्या कामासाठी 2.30 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तर नालदे-बोरीवली-अंजप (मुख्य जिल्हा मार्ग-107) या रस्त्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली असून, 1.79 रुपयांची तरतूद यासाठी करण्यात आली आहे.
 
पेण तालुक्यातील वाशी-वढाव-काळेश्री रस्ता (मुख्य जिल्हा मार्ग-23) विकसित करण्यासाठी 4.86 कोटी रुपये मंजूर केले आहेत. सुधागड तालुक्यातील उद्धर-कुंभारघर-महागाव-चंदरगाव-हातोंड-गोंडाव (राष्ट्रीय महामार्ग-548ए) रस्ता (मुख्य जिल्हा मार्ग-40) या रस्त्याच्या सुधारणेसाठी 6.76 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
 
पनवेल तालुक्यातील कोन-सावेळे (राज्य महामार्ग-105) या रस्त्याच्या सुधारणच्या कामाला मंजुरी देण्यात आली असून, याकरिता 14.65 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
 
दरम्यान, गडकरी यांच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील रस्ते व पायाभूत सुविधांचे जाळे अधिक मजबूत होणार आहे. याचे स्वागत होत असले तरी रायगडकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम पुर्ण होणार कधी? हा प्रश्न कायम आहे.