माणगांवचे नवीन लसीकरण केंद्र जिल्हा परिषदेच्या उतेखोल शाळेत सुरु

By Raigad Times    26-Apr-2021
Total Views |
Corona Vaccination_1 
 
  • माणगावकरांनी लसीकरण करुन घ्यावे
  • वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप इंगोले यांचे आवाहन
 
उतेखोल/माणगांव । माणगांवमधील कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र हे उपजिल्हा रुग्णालयाच्या कॅम्पसमध्ये असल्याने नागरिकांना पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कात येण्याची भीती होती. याची दखल घेत, पॉझिटीव्ह रुग्ण इतर नागरिकांच्या संपर्कात येऊ नये, याकरिता माणगांचे नवीन लसीकरण केंद्र हे नगरपंचायत इमारतीच्या मागे जिल्हा परिषदेच्या उतेखोल शाळा (कन्याशाळा) येथे सुरु करण्यात आले आहे.
 
माणगांव तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या पाहता, निष्काळजीपणा महागात पडेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र माणगांवची आरोग्य यंत्रणा, स्थानिक प्रशासन, तालुका प्रशासन यासह पोलीस प्रशासनही आपली महत्वाची जबाबदारी बजावत आहे. कोरोना प्रतिबंधक त्रिसूत्री नियमांचे काटेकोर पालन करुन लसीकरण करुन घेणे महत्वाचे असल्याने त्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत.

Corona Vaccination_1  
 
उपजिल्हा रुग्णालयाच्या कॅम्पसमधील लसीकरण केंद्र हे नगरपंचायत इमारतीच्या मागे जिल्हा परिषदेच्या उतेखोल शाळेत सुरु करण्यात यावे, अशी मागणी माणगांवमधील पत्रकारांनी खासदार सुनील तटकरे यांच्याकडे केली होती. याच धर्तीवर 25 एप्रिल रोजी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी माणगांव उपजिल्हा रुग्णालयास भेट देऊन डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संवाद साधून मार्गदर्शनपर सूचना दिल्या.

Corona Vaccination_1  
 
या नवीन लसीकरण केंद्राचे जनजागृतीपर कामकाज हे जे.एच.सी. ग्रुप माणगांव सामाजिक ग्रुपकडून करण्यात येत आहे. तसेच या लसीकरणाचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन माणगांव उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप इंगोले यांनी केले आहे.

Corona Vaccination_1  
 
दरम्यान, नवीन लसीकरण केंद्रात नागरिक व जेष्ठ नागरिक यांना उन्हात रांगेत उभे राहावे लागत आहे. तरी नगरपंचायतीकडून त्यांना सावलीसाठी मंडपाची व आसनांची व्यवस्था करावी, अशी मागणी पत्रकारांनी केली आहे. यावर तातडीने विचार करून मुख्याधिकारी राहुल इंगळे व माजी नगराध्यक्ष आनंद यादव यांनी ही व्यवस्था आम्ही करत आहोत, असे आश्वासित केले आहे.