रायगड : चोरीच्या मोटारसायकलींची पोलादपूरात विक्री

25 Apr 2021 19:51:23
arrest_1  H x W
 
देवळे गावठाणातून दोघांना घेतले ताब्यात
 
पोलादपूर । गेल्या वर्षभरात लॉकडाऊन काळात ठाणे व अन्य शहरी भागातून मोटारसायकली चोरुन आणून तालुक्यातील ग्रामीण भागात कमी किंमतीत विकणार्‍या दोन वाहनचोरांना रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने गजाआड केले आहे.
 
यासंदर्भात ठाणे येथे दुचाकी वाहनचोरीचे गुन्हे दाखल झाले होते. ठाणे व मुंबई शहरातील वाहनचोरीच्या गुन्ह्यांतील मोटारसायकली पोलादपूर तालुक्यात विकण्यात आल्याची खबर रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक दयानंद गावडे व त्यांच्या पथकाने पोलादपूर तालुक्यातील देवळे गावठाणामध्ये तपास केला.
 
या तपासादरम्यान येथील दोन तरुणांनी ठाणे शहरातील विविध भागांतून पाच मोटारसायकली चोरुन आदिवासी तरुण, बांधकाम व्यावसायिक तसेच नोकरदार तरुणांना कमी किंमतीमध्ये विकून मोटारवाहन मालकीची कागदपत्रे काही कालावधीने देण्याच्या बोलीवर व्यवहार केला होता, अशी माहिती मिळाली.
 
याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने या दोघा तरूणांना ताब्यात घेतले. त्यांनी चोरीची वाहने ज्यांना विकली त्या सर्वांना चौकशीसाठी पोलादपूर पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. यामुळे सदर वाहने चोरीची असल्याने ती खरेदी करुन कागदपत्रांची प्रतिक्षा करणार्‍यांचे धाबे दणाणले.
 
शुक्रवारी (23 एप्रिल) रात्री स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दोन्ही वाहनचोरांना मुद्देमालासह ताब्यात घेतले. त्यानंतर मोटारसायकल खरेदीदारांना प्रचंड मनस्ताप झाल्याचे दिसून आले.
Powered By Sangraha 9.0