रायगड : डोक्यात दगड घालून महिलेची हत्या

By Raigad Times    24-Apr-2021
Total Views |
Crime Spot_Murder Spot_1&
 
नेरळ ममदापूर येथील घटना
 
कर्जत । कर्जत तालुक्यातील नेरळजवळील ममदापूर ग्रामपंचायतीमध्ये राहणार्‍या एका आदिवासी महिलेची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली आहे. कमळी माया जाधव असे त्या मृत महिलेचे नाव असून ती भंगार गोळा करण्याचे काम करायची.
 
शुक्रवारी (23 एप्रिल) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास नेरळ ममदापूर ग्रामपंचायत हद्दीत येणार्‍या तुळशी इस्टेटशेजारी मोकळ्या जागेत एक महिला मूर्च्छित पडलेल्या अवस्थेत नागरिकांना दिसून आली. नागरिकांनी याबाबत तातडीने नेरळ पोलिसांना माहिती दिली.
 
घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलीस घटनास्थळी पोहचले. महिलेच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी समोर आल्याने पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरु केला. मृत महिलेचे नाव कमळी माया जाधव असे असून तिच्या पतीचे यापूर्वीच निधन झाले आहे. कमळी जाधव ही नेरळ गाव परिसरात फिरुन भंगार गोळा करण्याचे काम गेले कित्येक वर्षांपासून करत होती, अशी माहिती स्थानिकांनी दिली.
 
Crime Spot_Murder Spot_1& 
 
पोलिसांनी त्यानंतर त्या भागात फिरुन अज्ञात आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. रात्री कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांनी पोलिसांची पथके बनवून ती तपासासाठी रवाना केली आहेत.
 
दरम्यान, याप्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.