म्हसळा ग्रामीण रुग्णालयाला पालकमंत्र्यांनी दिली भेट

By Raigad Times    24-Apr-2021
Total Views |
Mhasla Rural Hospital_1&n
 
म्हसळा (सुशील यादव) : तालुक्यातील गजबजलेल्या म्हसळा बाजारपेठेत 30 खाटांची क्षमता असलेले ग्रामीण रुग्णालय आहे. मात्र या रुग्णालयात कर्मचारी व आवश्यक सेवा सुविधांची वानवा आहे. आज (24 एप्रिल) पालकमंत्री आदिती तटकरे यांनी म्हसळा ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन येथील आरोग्य व्यवस्थेची माहिती घेतली.
 
रुग्णालयात पहिल्या मजल्यावर कार्यान्वित असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र पंचायत समितीच्या जुन्या इमारतीत स्थलांतरीत करण्यात येणार आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या मजल्यावर कोरोना बाधित असलेल्या असिम्प्टमॅटीक रुग्णांना (टेस्ट पॉझिटीव्ह आहे पण लक्षणे नाहीत) किमान 15 बेडची व्यवस्था करून अशा रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत.आवश्यकता लागल्यास येथे ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासेल त्यांना ऑक्सिजन उपलब्ध करुन मिळेल, असे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
 
ग्रामीण रुग्णालयात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेले लसीकरण केंद्र म्हसळा पाभरे फाटा येथे सुरु करण्यात येणार असल्याचे सांगताना ग्रामीण रुग्णालयात होत असलेले ओपीडीचे काम आहे त्या स्थितीत कार्यान्वित असणार आहे. याच वेळी रुग्णालयात नवीन एक्सरे मशीन कार्यान्वित करण्यासाठी ऑपरेटरची गरज असल्याने पालकमंत्री आदिती तटकरे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांना थेट फोनवर संपर्क साधून ऑपरेटर व अन्य आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या.
 
यावेळी उपविभागीय अधिकारी अमित शेडगे, तहसीलदार शरद गोसावी, गटविकास अधिकारी वाय.एम.प्रभे, नगर पंचायत मुख्याधिकारी मनोज उकिर्डे, तालुका अध्यक्ष समीर बनकर, माजी सभापती नाझीम हसवारे, माजी नगराध्यक्षा जयश्री कापरे, माजी उपनगराध्यक्ष सुहेब हलदे, माजी गटनेते संजय कर्णिक, आरोग्य अधिकारी, कर्मचारी, पत्रकार उपस्थित होते.