तळा प्राथमिक आरोग्य केंद्राला ऑक्सिजन सिलेंडरची भेट

By Raigad Times    24-Apr-2021
Total Views |
tala primary health cente
 
तळा । कोरोनाच्या या काळात रुग्णांना लागणार्‍या ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन हिरवळ प्रतिष्ठान महाड, आपलं कोकण एक मराठी न्यूज चॅनेल आणि विराज केबल नेटवर्कतर्फे तळा प्राथमिक आरोग्य केंद्राला 10 किलो क्षमतेचे ऑक्सिजन सिलेंडर व त्याला लागणारे सर्व साहित्य भेट देण्यात आले.
 
रायगड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा कहर पहायला मिळत आहे. रुग्णांची वाढती संख्या काळजी करण्यासारखी आहे. रुग्णसंख्या कमी करण्यासाठी शासन वेगवेगळे पर्याय अवलंबत आहे. लॉकडाऊनही सुरु आहे. मात्र तळासारख्या ग्रामीण भागाचा विचार केला तर तालुक्याच्या ठिकाणी एकही अ‍ॅम्ब्युलन्स नाही. तर नव्याने होत असलेल्या 30 खाटांच्या इस्पितळाचे काम कासवछाप गतीने सुरु आहे.
 
तळे तालुक्यातील आरोग्याच्या बाबतीत एकच आधार आहे ते म्हणजे तळा शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्र. तळा तालुक्यासारख्या ग्रामीण भागातही कमी-अधिक प्रमाणात कोरोनाचे पॉझिटीव्ह आढळून येत आहेत. मात्र तालुक्यात एकही अ‍ॅम्ब्युलन्स नसल्याने, ग्रामीण भागातून एखादा रुग्ण तातडीने दुसरीकडे नेण्यासाठी 108 अ‍ॅम्ब्युलन्स मागवावी लागते. ती येण्यासाठी काही अवधी लागू शकतो आणि तेवढ्या वेळेत जर रुग्णाला ऑक्सिजनची गरज भासली तर त्या रुग्णाला तातडीने कृत्रिम ऑक्सिजन पुरवावा लागतो.
 
हीच गरज लक्षात घेता आज (24 एप्रिल) हिरवळ प्रतिष्ठान महाड, आपलं कोकण एक मराठी न्यूज चॅनेल आणि विराज केबल नेटवर्कतर्फे 10 किलो क्षमतेचे ऑक्सिजन सिलेंडर व त्याला लागणारे सर्व साहित्य तळा प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देण्यात आले. याप्रसंगी तळा प्राथमिक केंद्रातील डॉ. अमोल बिरवाडकर, डॉ. प्राची घोसाळकर, निलेश कार्लेकर (औषध निर्माण अधिकारी), मोहित मोरे आणि हिरवळ प्रतिष्ठानचे सदस्य प्रदीप शेठ आणि विराज केबल नेटवर्क तर्फे विराज टिळक उपस्थित होते.