हृदयी असावा राम...

By Raigad Times    21-Apr-2021
Total Views |
corona file photo_1 
 
श्रीरामाच्या रामराज्याविषयी माझे आजोबा खूप रंजक गोष्टी सांगत असत. रामायण हा महाग्रंथ त्यांना जवळपास मुखोद्गत होता. भगवान श्रीरामाच्या अंगी असणारे बरेचसे गुण माझ्या आजोबांच्याही अंगी होते. माझे आजोबा अखेरपर्यंत एकवचनी, सत्यवचनी राहिले. माझ्या बालपणी दूरदर्शनवर प्रसारीत झालेली रामायण नावाची महामालिका मी एकही भाग न चुकवता पाहिली होती. त्या मालिकेतील राम - रावण युद्धात दोन्हींकडून सुटलेली अस्रे परस्परांसमोर येऊन थांबली की मला खूप गंमत वाटायची.
 
रामाचे अस्र निकामी व्हायला नको अशी हुरहूर लागायची. मात्र अखेरीस रामाने रावणाचा वध केला तेव्हा काही काळ रावणाबद्दलही खूप हळहळ वाटून गेली होती. अगदी खर्‍याखुर्‍या रामाने खर्‍याखुर्‍या रावणालाच मारले असे क्षणभर वाटून रावणाने थोडे नमते घ्यायला हवे होते आणि रामानेही रावणाला ठार मारावयास नको होते असे वाटून गेले. माझे आजोबा सांगायचे, रावणही खूप विद्वान व प्रजाहितदक्ष राजा होता. अनेक बाबतीत त्याचा खूप गाढा अभ्यास होता. पण शेवटी तसेच व्हायचे होते त्याला काय करायचे, ना रामाचा दोष, ना आजोबांचा दोष.
 
रामनामाचा महिमा अगाध आहे. भारतीय अध्यात्म, धर्मशास्त्र, संस्कृती, समाजकारण, राजकारण इत्यादी गोष्टींचे आजही रामाविना पान हलत नाही. मात्र राम नावाच्या व्यक्तीचा जेवढा उदो उदो झाला तेवढा श्रीरामाने आयुष्यभर अंगिकारीलेल्या मुल्यांची जपणूक व पालन झाले नाही. ’ मुंह में राम और बगल में छुरी ’ असेच सर्रास पहावयास मिळाले.
 
सध्याची परिस्थिती बघता श्रीरामाची भव्य दिव्य मंदिरे असावित, सर्वत्र रामनामाचा गजर व्हावा, भगवान श्रीरामाचीच पूजाअर्चा व्हावी यापेक्षा भगवान श्रीरामाच्या मूल्यांची जपणूक व आचरण व्हावे असे मला वाटते. भगवान श्रीराम भव्य दिव्य मंदिरात अडकून बसण्यापेक्षा प्रत्येकाच्या हृदयीं असावा असेही वाटते. आजच्या रामजन्मोत्सवाच्या निमित्ताने हेच सांगावेसे वाटते की, केवळ रामनामाचा जप नको, तर भगवान श्रीरामाच्या मुल्यांचेही आचरण व्हावे. जय श्रीराम!
-----------------------------------
बाबू घाडीगांवकर, जालगांव, दापोली.
मो. 9421795955.