- स्वस्त धान्य रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांचा इशारा
- कोरोना काळात रेशनवरील ई-पॉस मशिन बंद ठेवण्याची मागणी
माणगाव (सलीम शेख) : कोरोना काळात रेशन दुकानावरील ई-पॉस मशिनवरुन लाभार्थ्यांचे अंगठे घेणे पुढील किमान दोन महिने बंद करावे व रेशन दुकानदारांना 50 लाखांचे विमा कवच द्यावे, अशी मागणी रेशन दुकानदारांकडून जोर धरत आहे. या मागण्या मान्य न केल्यास 1 मे पासून धान्य वाटप बंद करण्याचा इशारा स्वस्त धान्य रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी दिला आहे.
घोसाळकर यांनी याबाबत रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना निवेदन देऊन, रेशन दुाकनदारांच्या मागण्यांकडे वेधले आहे.
ऑनलाईन अंगठे घेतल्याने सरकारकडे सर्व डाटा वेळोवेळी जमा होतो, हे खरे असले कोरोना काळात ते अडचणीचे होणारे आहे. ई-पॅासवरुन धान्य वाटपास आमचा विरोध नाही; परंतु रेशन दुकानातून धान्य वाटप करताना एका लाभार्थ्यांचा किमान चार ते पाच वेळा अंगठा घ्यावा लागतो. एका दुकानातून दररोज किमान 200-250 लाभार्थ्यांना धान्य वाटप केले जाते. सर्वांचे अंगठे घ्यावे लागत असल्याने कोरोनाचा धोका अधिक वाढला आहे, याकडे प्रमोद घोसाळकर यांनी लक्ष वेधले आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत लाभार्थांचे अंगठे घेण्याचे थांबविले होते. त्याच धर्तीवर स्वस्त धान्य दुकानदाराचा अंगठा व आधार कार्ड प्रमाण मानून धान्य वाटप देण्यास परवानगी देणे गरजेचे असल्याचे स्वस्त धान्य रेशन दुकानदार संघटनेतर्फे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. कोरोना काळात धान्य दुकानदारांनी कोणाचा भूकबळी जाऊ नये यासाठी जीवाची पर्वा न करता धान्य वाटप केले. तरीही शासनाकडून त्यांच्या मागण्यांची दखल घेतली जात नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
कोरोना काळात ई-पॉस मशिन ठेवण्याबरोबरच, स्वस्त धान्य दुकानदारांना सरकारी कर्मचार्याचा दर्जा द्यावा, जागतिक अन्न कार्यक्रमानुसार प्रति क्विंटल 270 रुपये कमिशन द्यावे, दुकानदारांना विमा संरक्षण द्यावे, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या दुकानदाराच्या वारसाला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे किंवा राजस्थान राज्य सरकारच्या धर्तीवर पन्नास लाखांचा विमा काढून मिळावा, प्रति क्विंटल एक ते दीड कीलो घट पकडावी, जुन्या मशीन बदलून फोर-जी कनेक्शन देण्यात यावे, हमालीच्या नावाखाली दुकानदाराची होणारी लूट थांबवावी, आदी मागण्याही संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी केल्या आहेत.