पोलादपूरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी

By Raigad Times    12-Apr-2021
Total Views |
avakali paus_1   
  • विजांच्या कडकडाटांसह तासभर मुसळधार
  • ग्रामीण भागात काळी ठिकाणी पडल्या गारा
पोलादपूर (शैलेश पालकर) । पोलादपूर तालुक्यात आज दुपारी उन्हाच्या कडाक्याने अंगाची काहिली होत असताना दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अचानक आकाशामध्ये काळे ढग दाटून येत अवकाळी पावसाने हजेरी लावली. तासभर विजांच्या कडकडाटांसह मेघगर्जना करीत अवकाळी पाऊस पडला. तर काही ठिकाणी ग्रामीण भागात गारांचा पाऊस झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
 
या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील आंब्यांच्या झाडाचा मोहोर गळून पडला असून, कच्च्या कैर्‍यांनाही मोठ्या संख्येने गळती लागली. आधीच उन्हाने घामाच्या धारांनी ओथंबलेला पोलादपूरकर नागरिक थोड्याथोडक्या पावसाने सुखावला असला तर शेतकरीराजा मात्र अवकाळीच्या या संकटामुळे हातातोंडाशी आलेले आंबा पिक वाया गेल्याने चिंतातूर झाला आहे.
 
पोलादपूर तालुक्यात गेल्या पौर्णिमेपूर्वी पावसाने हजेरी लावली. मात्र, होलिकोत्सवानंतर सर्वत्र तापमानवाढीने जोर धरल्यामुळे या पावसाचा शिडकावा हवेत गारवा निर्माण करू शकला नाही. यंदा केवळ आंतरपिक म्हणून शेताच्या बांधावर तसेच वरकस जमिनीवर घेतलेले आंबापिकच शेतकर्‍यांना लॉकडाऊनच्या आर्थिक मंदीतून तारेल, असा विश्‍वास होता. हवेत वाढलेल्या उष्म्याची उपयुक्तता आंबा पिकावर दिसून येईल, म्हणून सुखावलेल्या आंबा बागायतदार शेतकर्‍यांनी लॉकडाऊनच्या आधीचा वेळ मोहोरावर कोणत्याही प्रकारचा रोग पडू नये, यासाठी फवारणी करून पिकाची निगा राखली होती.
 
मात्र, आज दुपारी अचानक आकाशात काळे ढग जमा झाले. सोसाट्याचा वारा सुटला आणि पोलादपूर शहरात पावसाने हजेरी लावली तर महाबळेश्वर रस्त्यालगतच्या काही भागांमध्ये गारांचा पाऊसही पडल्याची माहिती प्राप्त झाली. पोलादपूर तालुक्याचे तापमान अचानक झालेल्या या अवकाळी पावसाने कमी झाले असून अद्याप कोणत्याही नैसर्गिक आपत्तीबाबत प्रशासनाकडून माहिती प्राप्त झाली नाही.