गौरीबाई ..

By Raigad Times    08-Mar-2021
Total Views |
Gauribai 1_1  H
 
महिला दिनाच्या निमित्ताने आज एका अगदी वेगळ्या आणि फक्त पुरुषांच्याच मानल्या गेलेल्या क्षेत्रात काम करणाऱ्या बाई बद्दल लिहिणार आहे.
 
आमच्या शेतावर थोडं बांधकाम चालू आहे. साधारण अडीच महिन्यांपूर्वी पहिला स्लॅब पडणार होता. आम्हालाही त्याबद्दल उत्सुकता होती, त्यामुळे आम्ही तिघेही त्यादिवशी मुद्दाम बघायला गेलो होतो. मिक्सरचा आवाज, धावपळ,लगबगीने रेती- सिमेंटची घमेली वाहणारे स्त्रिया पुरुष, त्यांचं जोरजोरात एकमेकांना हाकारणं... असा एकच गदारोळ होता. आणि त्यावर देखरेख करणारी, खणखणीत आवाजात सूचना देणारी , कामचुकारपणा करणाऱ्या एखाद्या तरण्या पोराच्या पाठीत धपका घालणारी, दणदणीत व्यक्ती होती.
" गौरीबाई " !
 
बांधकामात प्रत्येक कामात कुशल असणारी वेगवेगळी लोकं असतात. तसे स्लॅब टाकण्याच्या कामात तरबेज असणारे काही खास लोक असतात. त्यांचा ग्रुपच असतो. त्याला ' टोळी' म्हणतात. त्या टोळीचा एक प्रमुख मुकादम असतो. तो बहुदा त्या स्लॅब कामाची सुपारी घेतो आणि आपली टोळी, मिक्सर, ट्रॉली सगळं सामान घेऊन जाऊन स्लॅबचं काम करवून घेतो. गौरीबाई ही त्या टोळीची मुकादम आहे. तिचा सगळा वावर बघूनच आम्ही प्रचंड प्रभावित झालो.
 
गौरीबाईशी थोड्या गप्पा मारल्यावर तिच्याबद्दल जे कळलं ते फार भारी होतं. गौरीबाई आधी अशीच टोळीत काम करत होती. मग स्वतःच हळूहळू छोटी छोटी कामं घ्यायला सुरुवात केली. नवऱ्याला मदतीला घेऊन टोळी वाढवली. गौरीबाईला पाच मुली आहेत, त्यातल्या दोघींची लग्नं झालीत. जावई पण गौरीबाईच्या हाताखालीच काम करतात. एक जावई आता बांधकामाची कंत्राटं घ्यायला लागला आहे. सगळ्यात धाकटी मुलगी यंदा दहावीत आहे. तिनी शिकावं अशी गौरीबाईची फार इच्छा आहे. तिला अभ्यास करायला सांगा असं मला सांगत होती.
 
" रात्र रात्र स्लॅब चालतो, मी एक मिनिट तिथून हलत नाही, या माणसांची जबाबदारी असते ना आपल्यावर" गौरीबाई सांगत होती. "कालच एकजण आजारी पडला होता , त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केला, रात्रभर तिकडे थांबले,आणि आज सकाळी इकडे आले बघा" ( बोलत असताना पण कोणी कामगार कामचुकारपणा करत नाही ना, कामाची गती कमी होत नाही ना, मिक्सर, ट्रॉली नीट चाललेय ना याकडे तिचं बारीक लक्ष होतं). आणि खरोखर आमच्याकडचा स्लॅब पहाटे पाच वाजेपर्यंत चालू होता, त्यानंतर सगळं सामान आवरून, सगळे कामगार गेल्यावर गौरीबाई घरी गेली.
 
एवढे 25- 30 कामगार सांभाळणं, दिवसरात्र सतत उभं राहून कामावर देखरेख करणं, सगळ्या यंत्रांची तंत्रं सांभाळणं आणि आर्थिक व्यवहार बघणं... सगळं ही एकटी खमकी बाई अगदी हसतमुखाने पार पाडते. कामगारांना धाक दाखवते तशीच त्यांच्या जेवणाखाणाची, औषधपाण्याची काळजी घेते. या पूर्णपणे पुरुषप्रधान क्षेत्रात ही बाई लीलया वावरते, पण त्यात आपण काही वेगळं करतोय याची जाणीवही तिच्या वागण्याबोलण्यात नाही ! तिचं काम हेच तिचं जगणं आहे ! ना तिला वेगळ्या महिलादिनाची गरज आहे , ना सबलीकरणाची !
                                                                                                                                        - सुजाता प्रसाद पाटील, अलिबाग