रायगड : फुलांच्या शेतीतून शोधली स्वयंरोजगाराची वाट

By Raigad Times    04-Mar-2021
Total Views |
Murud Sheti_1  
 
मुरुड काजूवाडी येथील शेतकरी रामदास पाष्टे यांनी ठेवला आदर्श
 
कोर्लई । मुरुड तालुक्यातील दुर्गम ग्रामीण भागातील भोईघर ग्रामपंचायत हद्दीतील काजूवाडी येथील शेतकरी रामदास पांडुरंग पाष्टे यांनी परिस्थितीवर मात करून त्यांच्या शेतात तीन गुंठे क्षेत्रात फुलांची शेती फुलवली आहे. यातून स्वयंरोजगाराची यशस्वी वाट शोधत त्यांनी इतरांसमोर आदर्श ठेवला आहे.

Murud Sheti 2_1 &nbs 
 
तालुक्यातील भोईघर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या दुर्गम भागात रामदास पाष्टे यांनी फणसाड धरणाजवळ काजूवाडीतील आपल्या शेतातील तीन गुंठे क्षेत्रात झेंडूच्या फुलांची व तीन गुंठे जमिनीत शेवंती पिकवली आहे. तर तीन गुंठ्यांत मका, एक गुंठ्यांत भुईमूग व एक गुंठ्यांत रताळ्याचे पिक घेतले आहे. त्यांनी सन 2016 मध्ये अलिबाग-वाडगांव येथील नातेवाईक महादेव पाष्टे यांच्या कडून शेवंतीची तीनशे रोपे आणून लावली होती. सन 2017 मधे नंतर एक गुंठ्यांत रोपे लावली हीच रोपे जागेत तयार करून यंदा तीन गुंठ्यांत रोपे लावण्यात आली आहेत. या रोपांची लागवड सरासरी ऑगष्ट महिन्यात केली जाते व डिसेंबर महिन्यात उत्पन्न मिळते.
 
यंदा फुलशेती बहरली; परंतु कोरोना रोगाचा प्रादुर्भाव, लॉकडाऊन, 3 जून रोजी झालेल्या चक्रीवादळामुळे फळभाजी-पाला व्यवसायावर परिणाम झाला आहे. मात्र रामदास पाष्टे यांनी या सर्व अडचणींवर मात करत, चांगली मशागत करुन, मेहनतीच्या जोरावर चांगले उत्पादन मिळविले आहे. त्यांनी तीन गुंठे जागेत शेवंतीची व तीन गुंठे जागेत झेंडूची रोपे व तीन गुंठे जागेत मका लावला. उरलेल्या एक गुंठे जागेत भुईमूग तर एक गुंठ्यांत रताळी लावली आहे. तीन महिन्यांनंतर त्यांना दिवसाकाठी चांगल्याप्रकारे रोजगार मिळाला आहे.
 
शेतात फळ-भाजीपाला पिक घेताना त्यांनी शेतात रासायनिक खतांचा वापर न करता यासाठी शेतातच 6×10 चा खड्डा तयार करून त्यात पालापाचोळा व शेणाचा वापर करून सेंद्रिय खत तयार केले. परिणामी दोन महिन्यानंतर फुलांच्या शेतीतून त्यांना दिवसाकाठी चांगल्यापैकी रोजगार मिळल्याचा एक वेगळाच अनुभव व आनंद स्वयंरोजगाराचे रहस्य सांगून जात होता.
बागायतदार शेतकर्‍यांनी आपल्या बागायतीत नारळ, सुपारी, आंबा पिकाबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतात फुले, कांदा, मका व रताळी लागवड करून अंतर्गत पिक घेतल्यास स्वयंरोजगाराची वाट खुली होऊ शकते, असा विश्वास रामदास पाष्टे यांनी व्यक्त केला.