रायगड : बेधुंद ट्रकचालकाने आठ जणांना उडवले!

By Raigad Times    31-Mar-2021
Total Views |
Accident_road accident_1&
 
तिघांचा जागीच मृत्यू; एक अत्यवस्थ
स्थानिक तरुणांनी ट्रकचालकाला पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात
 
रोहा (मिलिंद अष्टीवकर) रेवदंडा येथील जेएसडब्ल्यू कंपनी येथून रोह्याकडे येणार्‍या ट्रकच्या चालकाने बेधुंदपणे गाडी चालवत रेवदंडा ते चणेरापर्यंत आठ जणांना उडवल्याची धक्कादायक घटना आज (३१ मार्च) घडली आहे. यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, 1 महिला अत्यवस्थ आहे. तर प्राथमिक माहितीनुसार आणखी चारजण जखमी आहेत.

Accident_road accident_1& 
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रेवदंडा बाजूकडून एमएच04 ई वाय 8501 या ट्रकच्या चालकाने बेधुंदपणे गाडी चालवत साळाव, आमली येथे प्रत्येकी एका व्यक्तीला, तर चेहेर येथे दोन व्यक्तींना ठोकर मारुन जखमी केले. त्यानंतर भरधाव वेगाने गाडी रोहा बाजूकडे चालवत नेली. पुढील गावात सदर घटनेची खबर मिळताच स्थानिकांनी सदर ट्रक अडविण्याचा प्रयत्न केला असता या ट्रकचालकाने अनेक गाड्या व अडथळे उडवून लावत न्हावे फाटानजीक एका जोडप्याला व त्यांच्या लहानग्या मुलाला उडवले.

Accident_road accident_1&
 
यामध्ये जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक लक्ष्मण ढेबे व त्यांचा मुलगा यांचा जागीच मृत्यू झाला असून, त्यांच्या पत्नीचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत. सदर धडक इतकी जोरात होती की अपघातग्रस्त शिक्षकाच्या गाडीचा चक्काचूर झाला असून गाडी सुमारे चारशे मिटर फरफटत गेली आहे. त्यानंतर सदर चालकाने सारसोली गावाच्या पुढे चणेरा येथील नागरिक उदय वाकडे यांना ठोकरल्याने त्यांचादेखील जागीच मृत्यू झाला आहे. भरधाव वेगाने ट्रक चालवणार्‍या या चालकाला चांडगावनजीक स्थानिक युवकांनी धाडसाने पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे.

Accident_road accident_1& 
 
सदर घटनेचे वृत्त समजताच स्थानिक उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील कार्यवाही सुरू आहे. या घटनेमुळे स्थानिक जनतेमध्ये मोठा प्रक्षोभ आहे.