बकर्‍या चोरणार्‍या अट्टल चोरांच्या कर्जत पोलिसांनी आवळल्या मुसक्या

By Raigad Times    30-Mar-2021
Total Views |
Raigad Police_Crime news_
 
संतोेष पेरणे/कर्जत । कर्जत येथे गोठ्यातून रात्रीच्या सुमारास तब्बल 11 बकर्‍या, मेंढ्या चोरी झाल्याची घटना घडली होती. या घटनेचा तपास करण्यासाठी कर्जत पोलिसांनी प्रचंड मेहनत घेऊन अट्टल चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईने कर्जत पोलिसांचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
 
14 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास कर्जत शहरातील जुने बस स्टँड, भिसेगाव येथील दिपक दिगंबर धनगर यांच्या घराच्या बाजूला असलेल्या गोठ्यातून 11 मेंढ्या, बोकड, बकर्‍या अज्ञात चोरांनी चोरुन नेल्या होत्या. याप्रकरणी धनगर यांनी कर्जत पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. त्यानंतर याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करत, पोलीस उपनिरीक्षक सचिन गावडे व पोलीस अंमलदार भूषण चौधरी यांनी तपास सुरु केला.
 
पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन तेथील सीसीटीव्ही कॅमेरे, शेडुंग फाटा टोलनाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पाहिले. तपासात गुन्हा करतांना चोरांनी फोर्ड कंपनीची कार क्र. 8552 चा वापर केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. अर्धवट मिळालेल्या क्रमांकावरुन पोलीस नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर, पुणे यांची मदत घेण्यात आली. तसेच कौशल्य वापरुन पोलीस या वाहनापर्यंत पोहचले.
 
त्यानंतर सुंदरेश वरण गणेश मुदलियार उर्फ अण्णा (रा. सुभाष टेकडी, उल्हासनगर) व अकिल मोहम्मद अजीद कुरेशी (रा. कौसा, मुंब्रा) यांना ताब्यात घेण्यात कर्जत पोलिसांना यश आले. चौकशीमध्ये या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी चोरलेल्या मालाबाबत विचारणा केली असता, त्यांनी मटन व्यवसायाचे दुकान असल्याने सदरचा माल हा कापून त्याचे मटन विकल्याचे तपासात कबूल केले.
 
यातून मिळालेले 40 हजार रुपये रोख रक्कम तसेच गुन्हा करतांना वापरलेली फोर्ड कंपनीची आयकॉन कार क्र. एमएच-06/डब्ल्यू-8552 असा एकूण 1 लाख 40 हजार रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात कर्जत पोलिसांना यश आले आहे. या चोरांनी धुळे, नाशिक येथेही अशाच प्रकारचे गुन्हे केल्याचे तपासात पुढे आले आहे.
 
दरम्यान, ही कामगिरी पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर, पोलीस निरीक्षक अरूण भोर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक सचिन गावडे, पोलीस अंमलदार सुभाष पाटील, भूषण चौधरी, अश्रुबा बेद्रे यांनी केली आहे.