रोहा शहरातील तलावात सापडला मृतदेह

By Raigad Times    30-Mar-2021
Total Views |
मृतदेह_dead body_1 & 
 
धुळवड झाल्यापासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा सापडला मृतदेह
 
धाटाव (शशिकांत मोरे) रोहा नगरपालिका नजिकच्या तलावात आज एका ४१ वर्षीय इसमाचा मृतदेह सापडला आहे. महेंद्र यशवंत सोनवटकर असे मृत व्यक्तीचे नाव असल्याची माहिती रोहा पोलीस ठाण्यातून देण्यात आली आहे.
 
सोमवारी (२९ मार्च) धुलिवंदनाच्या दिवशी सायंकाळी सहा वाजता धुळवड उत्सव साजरा झाल्यानंतर महेंद्र यशवंत सोनवटकर (वय ४१, रा. धनगर आळी रोहा) हे घरात नसल्याची खबर रोहा पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. त्यांचा शोध घेत असताना आज (३० मार्च) सकाळी रोहा नगर परिषदलगत असलेल्या तलावामध्ये त्यांचा मृतदेह सापडला. यावेळी तेथे असलेली काही मुले व कामगार यांनी सोनवटकर यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढून रोहा उपजिल्हा रुग्णालयात हलविला.
 
तेथे उपजिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टर उपलब्ध नसल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र प्रकरण हाताबाहेर जाणार नाही, याची काही नागरिकांनी काळजी घेतली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष मयुर दिवेकर, रवींद्र चाळके, राजेश काफरे व नातेवाईक, ग्रामस्थ उपस्थित होते.
 
दरम्यान, या घटनेचा पुढील तपास रोहा पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर, ए.पी.आय शेगडे, कल्पेश काबळे, कुथे, प्रणित पाटील, सुनिल पाटील यांच्यासह सहकारी करीत आहेत.