जावटे येथील वणव्यात गुरांचा गोठा जळून खाक

By Raigad Times    03-Mar-2021
Total Views |
Forest Fire_जावटे गाव_1&n 
 
सुदैवाने गुरे बचावली; मात्र शेतकर्‍याचे नुकसान
 
गोवे-कोलाड (विश्वास निकम) । जावटे गावच्या मागील बाजूस असलेल्या डोंगराजवळ आज (3 मार्च) दुपारी लागलेल्या वणव्यात गुरांचा गोठा जळून खाक झाला. यावेळी गुरे बाहेर सोडली असल्याने थोडक्यात बचावली. मात्र पेंढा, लाकडे जळून शेतकर्‍याचे मोठे नुकसान झाले आहे.
 
जावटे गावच्या मागील बाजूस असलेल्या डोंगराजवळ वणवा लागला होता. या वणव्याची झळ गावापर्यंत पोहोचली आणि येथील रहिवासी गणेश तुकाराम जाधव यांच्या गुरांचा गोठा या वणव्याच्या भक्ष्यस्थानी सापडला. काही वेळातच संपूर्ण गोठा जळून खाक झाला. या गोठ्यात गुरांसाठी पेंडा, गवत साठवून ठेवण्यात आले होते. मात्र वणव्याने हे सारे जळून खाक झाले तसेच वाड्याच्या किमती लाकडांचीही राख झाली. सुदैवाने दुपारची वेळ असल्यामुळे गोठ्यामध्ये गुरे नव्हती. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. परंतु जाधव यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
 
मार्च, एप्रिल महिन्यात दरवर्षी डोंगरांना मोठ्या प्रमाणावर वणवे लागतात. परंतु वन विभाग कोणतीही ठोस उपाययोजना करीत नसल्यामुळे जंगल नष्ट होत चालले आहे. त्याची झळ मुक्या प्राण्यांना आणि आता आसपासच्या गावांनाही सोसावी लागत आहे.