कर्जत शहरातील भिंती झाल्या बोलक्या...

By Raigad Times    03-Mar-2021
Total Views |
Karjat nagar Parishad_कर् 
 
‘माझी वसुंधरा’ अभियानाची जोरदार तयारी
 
संतोष पेरणे/कर्जत । राज्य सरकारच्या स्वच्छ सर्व्हेक्षण अभियानानंतर आता नागरी भागासाठी ‘माझी वसुंधरा अभियान’ची घोषणा केली आहे. आपली वसुंधरा टिकावी, यासाठी कर्जतमध्ये ‘मी वसुंधरा’ अभियानातून शहरातील प्रत्येक नागरिकाला अभियानमध्ये सहभागी करुन घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. विविध संदेश देणार्‍या भित्तीचित्रांच्या माध्यमातून शहरातील भिंतीही बोलक्या झाल्या आहेत. दरम्यान, राज्यात पहिल्या 50 मध्ये नामांकन मिळविणार्‍या कर्जत नगरपरिषदेचा राज्यात बोलबाला झाला पाहिजे, यासाठी नगरपरिषदेने जोरदार तयारी केली आहे.
 
कर्जत नगरपरिषद ‘माझी वसुंधरा अभियान 2021’मध्ये सहभागी झाली आहे. नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये ‘आपले शहर हरित शहर’ ही संकल्पना राबविण्यात आली आहे. त्यानिमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना हरित शपथ देण्यात आली. त्यात या अभियानाची माहिती शहरातील नागरिकांना व्हावी आणि नागरिकांनी या अभियानात शंभर टक्के योगदान द्यावे, यासाठी शहरातील चौकाचौकात आणि भिंतींवर ‘माझी वसुंधरा अभियाना’ची माहिती देणारी भित्तीचित्रे रंगविण्यात आली आहेत.
 
Karjat nagar Parishad_कर्
 
कर्जत नगरपरिषदेच्या माध्यमातून ‘पर्यावरण बचाव आणि माझी वसुंधरा बचाव’चा संदेश देण्यासाठी सायकल फेरी काढण्यात आली. यात असंख्य कर्जतकर सहभागी झाले होते. तर शहरातील प्रत्येक महिलेच्या हातात तुळशीचे रोप देण्याचा उपक्रमही सुरु करण्यात आला असून कर्जत शहरातील सर्व नऊ प्रभागात हा उपक्रम राबविला जाणार आहे. कर्जत शहराच्या मध्यभागातून वाहत असलेल्या; परंतु उन्हाळ्यात कोरड्या पडणार्‍या उल्हास नदीचे पाणी दूषित होत असते. त्यात कर्जत शहरातील सांडपाणी ही सर्वांत मोठी समस्या असून त्यावर मार्ग काढण्यासाठी कर्जत नगरपरिषदेने नियोजन केले आहे.
 
कर्जत शहरातील सर्व 18 नगरसेवकांच्या प्रभागात पालिकेच्या आरोग्य विभागाने तयार केलेल्या पथनाट्यातून जनजागृती सुरू आहे. दररोज वेगवेगळ्या ठिकाणी हे पथक जनजागृती करण्यावर भर देत आहे. ‘माझी वसुंधरा अभियान’च्या धर्तीवर नदी संवर्धन कार्यक्रम राबविला जाणार असल्याची माहिती नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी दिली आहे.