पनवेल : विक्री बंदी असलेली वाहने विकणारी टोळी गजाआड

By Raigad Times    03-Mar-2021
Total Views |
Crime in Panvel_1 &n
 
  • विविध राज्यात विकलेली 7 कोटींची 151 वाहने हस्तगत
  • गुन्हे मध्यवर्ती शाखेची धडाकेबाज कामगिरी
पनवेल (संजय कदम) । विक्री बंदी असलेल्या वाहनांची बनावट कागदपत्रे बनवून त्याची विक्री विकणार्‍या 9 जणांच्या टोळीला गुन्हे मध्यवर्ती शाखेने गजाआड केले आहे. त्यांच्याकडून विक्री केलेल्या जवळपास 7 कोटी 15 लाख रुपये किंमतीच्या 151 गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातच नव्हे तर दिल्ली, हरियाणा, गुजरात, राजस्थान, तेलंगणा, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, पंजाब या राज्यांमध्ये विविध ठिकाणी या वाहनांची विक्री करण्यात आली होती.
 
या कारवाईत पोलिसांनी आनम असलम सिद्धीकी (42), शाबान रफिक कुरेशी (32), मनोहरप्रसाद व्यंकटराव जाधव (31), वसीम मोहम्मद उमर शेख (31) या चौघांना पनवेल येथून अटक केली. त्यानंतर गौरव सुभाषचंद्र देम्बला (32) आणि प्रशांत एस.नरसय्या शिवरार्थी (26) या दोघांना दिल्ली व हैद्राबाद येथून तसेच राशीद खान अहमद खान (42), चंद्रशेखर ज्ञानदेव गाडेकर (31) या दोघांना पनवेलमधून तर इमरान युसूफभाई चोपडा (38) याला गुजरातमधील अहमदाबाद येथून अटक केली आहे.
 
बीएस-4 इंजिन असलेल्या वाहनांमुळे प्रदूषणात वाढ होत असल्याने भारत सरकारने मार्च 2020 पासून बीएस-4 इंजिन असलेल्या वाहनांना बंदी घातली आहे. शासनाने बंदी केलेल्या मारुती कंपनीच्या सियाज, ब्रिझा, सेलेरीओ, वॅगनार, इको, बलेनो, एस क्रॉस अशा वेगवेगळ्या मॉडेलच्या कार पुराच्या पाण्यामध्ये बुडाल्यामुळे त्या कार मारुती कंपनीने भंगार म्हणून लिलावात काढल्या होत्या. यातील 407 कार चेंबूर येथील ऑटोमोटीव्ह मॅन्युफ्रॅक्चर्रस प्रा.लि. या कंपनीने भंगार म्हणून लिलावात विकत घेतल्या होत्या.
 
मारुती कंपनीने सदर कार ताब्यात देण्यापूर्वी सर्व कारच्या चेसीस नंबर कट करुन आनम अस्लम सिद्धीकी (42) याच्या ताब्यात पॅप करण्यासाठी दिल्या होत्या. मात्र आनम सिद्धीकी व त्याच्या इतर साथीदारांनी सदरच्या कार पॅपमध्ये न काढता त्या कारवर पुन्हा बनावट चेसीस नंबर टाकले. तसेच जुन्या रजिस्टर झालेल्या गाड्यांचे इंजिन नंबर व चेसीस नंबरची बनावट व खोटी कागदपत्रे तयार केली. त्यानंतर या टोळीने बनावट कागदपत्रांच्या आधारे सदर कारचे वेगवेगळ्या राज्यातील आरटीओ कार्यालयात वेगवेगळ्या ग्राहकांच्या नावाने नोंदणीही केली.

Crime in Panvel_1 &n 
 
त्यानंतर या टोळीने पनवेलच्या शिरढोण भागात कार्यालय थाटले. सदर कार पुराच्या पाण्यात खराब झाल्याचे ग्राहकांना खोटे सांगून या कारची 2 ते 3 लाखांमध्ये विक्री करण्यास सुरुवात केली. तसेच अनेकांकडून या टोळीने रोख रक्कमही स्वीकारली. याबाबतची माहिती गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाला मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन.बी.कोल्हटकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गज्जल व त्यांच्या पथकाने पनवेलजवळील शिरढोण येथील कार्यालयावर छापा मारुन यातील काहींना अटक केली होती. त्यावेळी पोलिसांना बनावट कागदपत्रे व इतर साहित्य मिळून आले होते.
 
गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा अधिक तपास केल्यानंतर पॅप करण्यासाठी देण्यात आलेली वाहने ते बनावट कागदपत्रांद्वारे विकत असल्याचे आढळून आले. त्यानंतर मध्यवर्ती कक्षातील पथकाने महाराष्ट्रातील विविध जिल्हे, दिल्ली, हरियाणा, गुजरात, राजस्थान, तेलंगणा, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, पंजाब इत्यादी राज्यात या टोळीने विकलेल्या तब्बल 7 कोटी 15 लाख रुपये किंमतीच्या 151 कार हस्तगत केल्या. या टोळीने बनावट कागदपत्राच्या आधारे हिमाचल प्रदेश व अरुणाचल प्रदेश आरटीओ कार्यालयात रजिस्ट्रेशन केलेल्या 5 कारदेखील हस्तगत केल्या आहेत.
 
तपासामध्ये इम्रान युसूफभाई चोपडा (38) याने सदर कारवर नवीन चेसीस नंबर टाकण्याकरिता औरंगाबाद येथून कॉम्फ्युटराईज मशिन खरेदी केल्याचे आढळून आले आहे. तसेच सदर मशिनद्वारे त्याने काही गाड्यांना बनावट चेसीस नंबर तयार करुन त्याद्वारे आरटीओ नोंदणी केल्याचेदेखील निष्पन्न झाले आहे. सदरची मशिन हस्तगत करण्यात आली असून या टोळीने सदर गाड्यांचे व्यवहार, नोंदणी, पीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे तयार करण्याकरिता वापरलेले लॅपटॉप, प्रिन्टर, स्टॅम्प पेपर, रबरी शिक्के, बनावट इन्वाईस, मोबाईल फोन इत्यादी मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी दिली.
 
या टोळीने अशा विकलेल्या इतर वाहनांचा शोध घेण्यात येत असल्याचेदेखील सिंह यांनी सांगितले.