अपघातानंतर रिक्षा-कार जळून खाक; रिक्षातील तिघांचा होरपळून मृत्यू

By Raigad Times    29-Mar-2021
Total Views |
Accident_1  H x
  • कर्जत-कल्याण राज्यमार्गावरील दुर्घटना
संतोष पेरणे/कर्जत । कर्जत-कल्याण राज्यमार्गावर कारने रिक्षाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात रिक्षातील सीएनजी सिलेंडरचा स्फोट होऊन तिघांचा मृत्यू झाला. तर कारमधील तिघेजण किरकोळ जखमी झाले असून, नेरळ पोलिसांनी अपघातास कारणीभूत असलेल्या कारचालकाला ताब्यात घेतले आहे. आज (29 मार्च) सकाळी ही दुर्घटना घडली.
 
कर्जत-कल्याण राज्यमार्गावर अपघातांची मालिका सुरुच आहे. बदलापूर येथील कुळगाव भागात राहणारे सुभाष जाधव हे रिक्षा (एमएच 05-सीजी 4351) घेऊन पत्नी शुभांगी यांच्यासह सकाळी कर्जतमधील नेरळ पाडा येथे आले. तेथे राहणार्‍या सरिता मोहन साळुंखे यांना सोबत घेऊन ते कर्जतला गेले. सरिता साळुंखे या रिक्षाचालक जाधव यांच्या मेहुणी असून त्या नेरळ येथील अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होत्या.
 
Accident_1  H x 
 
कर्जत येथील कामे उरकून जाधव हे रिक्षा घेऊन कर्जत-कल्याण राज्यमार्गाने नेरळकडे येत होते.गारपोली गावाचा जोडरस्ता ओलांडून रिक्षा सिद्धिविनायक हॉस्पिटलसमोर येत असताना कल्याण येथून कर्जत रस्त्याने जात असलेल्या हुंडाई एक्सेंट कारने रिक्षाला समोरून धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की रिक्षाचालक यांच्या सीट खाली असलेला सीएनजी सिलेंडरचा स्फोट झाला आणि त्यांच्यापैकी एकही व्यक्ती बाहेर पडू शकली नाही.
 
रिक्षाचालक सुभाष जाधव, शुभांगी जाधव (दोघे रा.बदलापूर) यांच्यासह सरिता साळुंखे यांचा अक्षरशः कोळसा झाला. या सर्वांचा होरपळून मृत्यू होत असताना आजूबाजूच्या लोकांना बघत राहण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. कारण दोन-तीन मिनिटांतच दोन्ही वाहने जळून खाक झाली होती. रिक्षामधील कागदपत्रांवरुन अपघातात जळालेल्या व्यक्तींची ओळख पटली. दुसरीकडे कारमधील तब्बल सहा व्यक्ती गाडीला आग लागताच बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला आहे. 

Accident_1  H x 
 
तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले आहेत. या अपघातास कारणीभूत असलेल्या कारचालकास नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी आणि नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर, नेरळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक तानाजी नारनवर आदींसह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे.
 
दरम्यान, या रस्त्यावर आतापर्यंत मागील वर्षभरात 12 अपघात झाले असून यापूर्वी सात जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. स्थानिकांनी या रस्त्यावर गावे आणि शाळा-रुग्णालय असलेल्या ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी केली आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग त्याबाबत उदासीन असल्याने अपघात घडत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांमधून केला जात आहे.
 
Accident_1  H x