धक्कादायक! श्रीवर्धन पंचायत समिती कार्यालयात कर्मचार्‍याची आत्महत्या

By Raigad Times    28-Mar-2021
Total Views |
Suicide_आत्महत्या_1 
 
पंख्याला गळफास लावून जीवन संपवले
 
श्रीवर्धन : श्रीवर्धन पंचायत समितीतील एका कर्मचार्‍याने आज दुपारी कार्यालयातच पंख्याला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
 
आज (28 मार्च) श्रीवर्धन पंचायत समिती कार्यालयातील अभिलेखा कक्षात कार्यरत असलेले नंदकिशोर रुपराव चव्हाण (वय 51) हे नेहमीप्रमाणे कार्यालयात हजर होते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास चव्हाण यांनी पंचायत समिती कार्यालयातील अभिलेखा कक्ष विभाग-ब मधील एका खोलीमध्ये आत्महत्या केली.
 
इन्डेक्स बॉक्सवर उभे राहून पंख्याला दोरीने गळफास लावून नंदकिशोर चव्हाण यांनी आपले जीवन संपवले. कार्यालयीन कामाकरिता दुसरे कर्मचारी हे चव्हाण यांना पाहण्याकरिता गेले असता ते पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यामुळे कार्यालयात गोंधळ उडाला.
 
या घटनेबाबत श्रीवर्धन पोलिसांना कळविण्यात आले. या घटनेची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक यु.एम. खिरड करीत आहेत.
 
दरम्यान, आत्महत्येपूर्वी नंदकिशोर चव्हाण यांनी चिठ्ठी लिहिली असून त्यामध्ये घरगुती कारणावरुन आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. चव्हाण यांचा मृतदेह ताब्यात घेऊन त्यांच्या मूळगावी नागपूर येथे पाठविण्यात आला आहे.