‘पेटीएम’चा गैरवापर करुन मॉल, दुकानदारांना गंडा घालणारी जोडी गजाआड!

By Raigad Times    28-Mar-2021
Total Views |
Vashi Police_Crime News_1
 
74 हजारांचा मुद्देमाल जप्त; पोलीस कोठडीत रवानगी
 
पनवेल । विविध मॉल, दुकानांमधून महागड्या वस्तू, कपड्यांची खरेदी केल्यानंतर बनावट मेसेज तयार करुन पेटीएमद्वारे खरेदीचे बिल पेड केल्याचा बनाव करुन, विक्रेत्यांची फसवणूक करणार्‍या जोडीला वाशी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून 74 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, अधिक तपास सुरु आहे.
 
पेटीएम अ‍ॅपचा गैरवापर करुन विक्रेत्यांची फसवणूक केली जात असल्याच्या घटना घडत असल्याचे निदर्शनास आले होते. वाशी पोलीस ठाणे हद्दीत अदा ब्युटीक येथे 9 मार्च रोजी कपडे खरेदी करून 38 हजारांचे बिल पेटीएद्वारे अदा केल्याचे भासवून, तसेच दुकानदार यांना पैसे पेड केल्याचा पेटीएम अ‍ॅपचा खोटा मेसेज दाखवून फसवणूक करण्यात आली होती.
 
याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपास सुरु केला. तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराच्य मदतीने भामट्यांचा शोध घेतला आणि प्रेम नवरोत्तम सोलंकी (वय 31, रा. सोनाविला सोसायटी, सेक्टर 21, घणसोली, नवी मुंबई) व त्याची त्याची मैत्रीण प्रिती राजेश यादव उर्फ तन्वी शर्मा (वय 23, सोनाविला सोसायटी, सेक्टर 21, घणसोली नवी मुंबई) यांना गजाआड करण्यात आले.
या दोघांनी दुकानात प्रवेश करुन पती-पत्नी असल्याचे नाटक करुन, खोटे नाव सांगून ही फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. फसवणूक करताना ते पेटीएम स्पुफ नावाच्या अ‍ॅप्लिकेशनद्वारे बनावट बिल पेड केल्याची पावती तयार करून दुकानदारांना गंडा घालत असल्याचेही तपासात पुढे आले आहे.
 
या दोघांकडून फसवणूक केलेले 38 हजार रुपये किंमतीचे कपडे हस्तगत करण्यात आले आहेत. तसेच गाडी, 2 मोबाईल असा एकूण 74 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या भामट्या जोडीला वाशी न्यायायलासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांनी अशाच प्रकारचे विविध गुन्हे नवी मुंबई परिसरात केल्याची दाट शक्यता असल्याने त्यादृष्टीने विविध मॉल, व्यापारी, ज्वेलर्स दुकानदार यांना संपर्क करुन त्यादृष्टीने माहिती घेण्याचे काम सुरु आहे.
 
दरम्यान, ही कामगिरी पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह, पोलीस सहआयुक्त डॉ.जय जाधव, वाशी परिमंडळ-1 चे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे, सहायक पोलीस आयुक्त विनायक आ. वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल (गुन्हे), गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन ढगे, पोलीस हवालदार शैलेंद्र कदम, पोलीस नाईक सुनिल चिकणे, पोलीस शिपाई गोकुळ ठाकरे, दिलीप ठाकूर, केशव इंगळे यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे.