पेण नगरपालिकेच्या अनागोंदी कारभाराविरोधात मनसे आक्रमक

By Raigad Times    23-Mar-2021
Total Views |
MNS_Pen _1  H x 
 
विविध समस्यांबाबत मुख्याधिकार्‍यांना निवेदन
 
पेण (देवा पेरवी/प्रदीप मोकल) पेण नगरपालिका हद्दीत सुरु असलेल्या बेकायदा टपर्‍या, बांधकामे तसेच अनागोंदी कारभाराबाबत मनसेचे रुपेश पाटील आणि मनसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेत नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अर्चना दिवे यांना जाब विचारला. यावेळी झालेल्या चर्चेत अनधिकृत टपर्‍या, अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणार असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले.
 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सर्वसामान्य पेणकरांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी रुपेश पाटील यांनी पेण नगरपरिषद हद्दीतील अनधिकृत बांधकामे, पार्किंगचे अव्यवस्थापन, अनधिकृत टपर्‍या, पेण हातगाडीवाल्यांचे वाढते अतिक्रमण, विना परवानगी होत असलेली पक्की बांधकामे व त्यावर केलेली कारवाई, आठवडा बाजार, दररोज शहरातील हातगाड्या व इतर विक्रेत्यांमार्फत नगरपालिकेला मिळणारा कर याबाबत जाब विचारला.
 
मुदतबाह्य व मोडकळीस आलेल्या इमारती आणि त्याबाबत पेण नगरपालिकेने कोणती कार्यवाही केली, याबाबतही विचारणा करण्यात आली. पेण नगरपालिकेने शहरातील सांडपाणी हे थेट भोगावती नदीपात्रात नाल्याद्वारे पिंपळडोह येथे सोडलेले आहे. तेथून शहरासाठी पाणीपुरवठा केला जातो. याबाबत नगरपालिकेने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही मनसेने केली.
 
नगरपालिकेचे कर्मचारी सर्वसामान्य नागरिकांसोबत सतत गैरवर्तणूक व अरेरावीची भाषा करतात, याकडे लक्ष वेधत मनसेने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी यावेळी केली. तसेच पेणमधील समस्यांबाबतचे निवेदन मुख्याधिकारी यांना देण्यात आले. यावेळी मनसे कार्यकर्ते रुपेश पाटील, समाज सेवक समीर म्हात्रे, श्रीराम पाटील, राकेश पाटील, दिनेश पाटील, हनुमान नाईक, किर्ती पाटील, निलम पवार, रेखा तांडेल, संगीता पाटील, निकिता पाटील आदी उपस्थित होते.