श्रीवर्धन (संतोष चौकर) श्रीवर्धन शहरात चोरट्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. शनिवारच्या रात्री चोरट्यांनी शहरातील सहा घरे फोडून ऐवज लंपास केला आहे. या घटनांमुळे शहरातील नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, चक्रीवादळामुळे श्रीवर्धन शहरातील बहुतांश सीसीटीव्ही कॅमेरे निकामी झाले आहेत. त्यामुळे शहराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शनिवार, दि. 20 मार्चच्या रात्री चोरांनी श्रीवर्धन शहरातील तब्बल सहा बंद घरे फोडली आहेत. प्रभू आळी, पेशवे आळी व साळीवाडा या परिसरात या घरफोड्या झाल्या आहेत. अजित कुळकर्णी, पराग कुळकर्णी, भूषण महाडकर, अनिता ताम्हणे, निषाद विरकुड यांची घरे चोरट्यांनी फोडली असून नितीन गजानन करडे यांचे घर फोडून जवळजवळ 71 हजारांचा सोन्याच्या दागिन्यांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.
हा परिसर अत्यंत गजबजलेला असून याठिकाणची घरे खूप जवळजवळ आहेत. तरीसुद्धा चोरांनी या ठिकाणी चोर्या केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. बंद घरे फोडताना चोरट्यांनी मुख्य दरवाजा तसेच घरातील इतर सर्व वस्तूंची माहिती असल्याप्रमाणेच चोर्या केल्या आहेत. त्यामुळे यात कोणी स्थानिक चोर आहे की काय? अशी शंकाही उपस्थित केली जात आहे.
सहा घरफोड्यांच्या घटनांपैकी नितीन गजानन करडे यांनी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून श्रीवर्धन पोलिसांनी भा.द.वि. कलम 380, 454, 457 अन्वये चोरी व घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक खिरड हे करीत आहेत.
2017 सालच्या घरफोड्यांची आठवण...
या घटनेमुळे श्रीवर्धनकरांना 2017 सालच्या घरफोड्यांच्या सत्राची आठवण झाली आहे. 2017 साली अशाच प्रकारे अनेक बंद घरे फोडून चोरट्यांनी काही मिळते का, हे तपासण्याचा प्रयत्न केला होता. परंतु सर्व बंद घरे ही मुंबईस्थित नागरिकांची असल्याने त्यांनी आपल्या घरामध्ये फक्त कपडे अंथरुण याव्यतिरिक्त काहीही ठेवले नसल्याने चोरट्यांच्या हाताला काही लागले नव्हते.
सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत; सुरक्षेचा प्रश्न गंभीर
श्रीवर्धन शहर पर्यटनाच्या दृष्टीने सध्या खूप मोठ्या प्रमाणावर भरभराटीला येत आहे. यासाठी राज्य सरकारने श्रीवर्धन शहरामध्ये नगरपरिषदेच्या माध्यमातून 72 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. परंतु 3 जून 2020 रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे बहुतांश सीसीटीव्ही कॅमेरे निकामी झाले आहेत. काही ठिकाणचे कॅमेरे जरी उभे असले तरी त्यांना जोडणार्या वीज वाहिन्या तुटल्यामुळे कॅमेरे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. यामुळे शहराच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आली आहे.