पनवेलमध्ये बनावट विदेशी मद्य निर्मिती केंद्रावर छापा; दोघांना अटक

22 Mar 2021 19:39:22
excise department seized
 
  • 13.5 लाखांचा मुद्देमाल जप्त
  • राज्य उत्पादन शुल्कच्या पनवेल भरारी पथक क्र. 2 ची कारवाई
अलिबाग । पनवेल तालुक्यातील मोर्बे खैरवाडी येथील नदीकाठच्या शेतघरात सुरु असलेल्या बनावट विदेशी मद्य निर्मिती केंद्रावर राज्य उत्पादन शुल्कच्या पनवेल भरारी पथक क्र.2 ने छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत बनावट विदेशी मद्याच्या बाटल्या व बनावट मद्य निर्मितीचे साहित्य असा साडेतेरा लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
 
गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसा, 20 मार्च रोजी ईमानूल मर्सिहोम आश्रमच्या बाजूला नदीकाठी असलेल्या शेतघरावर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. यावेळी विविध उच्च प्रतीच्या बाटल्यांमध्ये भरणा करुन बनावट विदेशी मद्य (स्कॉच) तयार केलेल्या मद्याच्या सुमारे 750 व 1 हजार मि. ली. क्षमतेच्या एकूण 110 बाटल्या तसेच बनावट मद्य तयार करण्याकरिता वापरले जाणारे बुच, लेबल, टोचे, ब्रश, लॅमिनेशन मशिन व इतर साहित्य, महिन्द्रा कंपनीचे चारचाकी वाहन व एक ओपो कंपनीचा मोबाईल असा 13 लाख 24 हजार 860 किंमतीचा व रोख रक्कम 18 हजार 350 असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
 
याप्रकरणी शिबिन दिनेश तिय्यार (वय 27), सुशिलाल सुकुमार तिय्यार (वय 33) या दोघांना महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 चे कलम 65 (ए) (डी) (ई) (एफ) 81, 83, 86, 90 व 98 अन्वये गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. तर प्रजीब प्रभाकरण के. हा फरार असून त्याला व जागामालक यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या गुन्ह्यातील जप्त केलेल्या बनावट विदेशी मद्याची (स्कॉच) कोणकोणत्या भागात विक्री केलेली आहे, याचा तपास सुरु आहे. तसेच यामध्ये आंतरराष्ट्रीय टोळीचा समावेश असल्याची दाट शक्यताही विभागाने व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक किर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक शिवाजी गायकवाड करीत आहेत.
 
दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप, राज्य उत्पादन शुल्क (अंमलबजावणी व दक्षता) संचालक उषा वर्मा, कोकण विभागीय उपायुक्त सुनील चव्हाण, रायगडच्या अधीक्षक किर्ती शेडगे, उपअधीक्षक विश्वजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक एस. एस. गोगावले, निरीक्षक अविनाश रणपिसे, निरीक्षक वामन चव्हाण, दुय्यम निरीक्षक एस. एस. गायकवाड, दुय्यम निरीक्षक ए. सी. मानकर, दुय्यम निरीक्षक व्ही.बी.बोबडे, दुय्यम निरीक्षक गोविंद पाटील, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सुभाष जाधव तसेच पालवे, संदीप पाटील, जवान यू.एन.पंची, जवान-नि-वाहनचालक हाके, महिला जवान एम. ए. मोरे, मनोज भोईर व अनंत जगदाडे या अधिकारी, कर्मचार्‍यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Powered By Sangraha 9.0