रोहा तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांना दिले सह्यांचे निवेदन
रोहा । तालुक्यातील पिंगळसई ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयाची नवीन वास्तू बांधण्यात येत असून नुकतेच त्यासाठीचे भूमिपूजन खा. सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पिंगळसईत करण्यात आले. मात्र खाजगी जागेत सदर इमारत बांधण्यास काही ग्रामस्थांनी विरोध केला आहे. याबाबतचे लेखी तक्रारपत्र ग्रामस्थांनी सह्यांची मोहीम राबवून रोहा तहसीलदार आणि गटविकास अधिकारी रोहा यांना सादर केले आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात, सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकांनी ग्रामस्थांचे म्हणणे विचारात न घेता ठराव घेतला असल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी केला आहे. जुन्या इमारतीच्या ठिकाणीच नवीन इमारत उभी करावी, म्हणून काही प्रमुख ग्रामस्थांनी हे सह्यांचे निवेदन दिले आहे. यावेळी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सुनील देशमुख, बबन शांताराम मोहिते, शंकर काशिनाथ शिंदे, रमेश भिकू देशमुख, पांडूरंग वाघमारे, प्रमोद देशमुख, संतोष सोनू खेरटकर आदी उपस्थित होते.
ग्रुप ग्रामपंचायत पिंगळसईचे नवीन कार्यालय बांधण्यासंबंधी 1 मार्च रोजी ठराविक लोकांच्या सह्या घेण्यात आल्या व लगेचच 2 मार्च रोजी अतितातडीची सभा घेण्यात आली, असे काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील देशमुख यांनी सांगितले. या सभेत जुने ग्रामपंचायत कार्यालय रद्द करुन गावापासून काही अंतरावर खाजगी जागेत ग्रामपंचायत कार्यालय बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. खाजगी मालकाकडून देण्यात आलेली 4 गुंठे जागा ही भातशेती असल्याने त्या जागेत बांधकाम करणे बेकायदेशीर आहे. त्याचप्रमाणे सदर मिळकतीची आवश्यक ती बिनशेती परवानगी घेऊन जमीन नोंदणीकृत दस्ताद्वारे ग्रामपंचायतीच्या नावावर करुन त्यावर बांधकाम करणे आवश्यक होते, असेही त्यांनी म्हटले आहे.
ग्रामपंचायत कार्यालय जुन्या जागेत न बांधता खाजगी लांब असलेल्या जागेत मनमानी करुन बांधण्यात येत असल्याने ग्रामस्थांची गैरसोय होणार असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाच्या अनुषंगाने न्याय न मिळाल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करु, असा इशारा या ग्रामस्थांनी दिला आहे.