पोलादपूर : रानबाजिरे धरणात सापडला मृतदेह

By Raigad Times    02-Mar-2021
Total Views |
Poladpur deadbody_1 
 
तालुक्यातील 15 दिवसांतील दुसरी घटना
पोलिसांसमोर तपासाचे आव्हान
 
पोलादपूर (शैलेश पालकर) - पोलादपूर तालुक्यात गेल्या 15 दिवसांत महाबळेश्वर-वाई मार्गालगत दुसरा अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. यापूर्वी तालुक्यातील कुंभळवणे येथे एका अज्ञात पुरूषाचे प्रेत आढळून आले होते. या दोन घटनांमुळे पोलादपूर पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभ राहिले आहे.
 
सोमवारी (1 मार्च) पोलादपूर तालुक्यातील रानबाजिरे धरणाच्या पात्रामध्ये पुढील बाजूला पाण्यामध्ये एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह तरंगत असल्याचे आढळून आले. मोरगिरी निकमवाडीतील विश्वास निकम यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ए.पी.चांदणे यांनी सहकार्‍यांसमवेत घटनास्थळी भेट दिली. या घटनेचा तपास पोलीस उपनिरिक्षक लोणे करीत आहेत. या घटनेच्या पंधरा दिवस आधी, 18 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास 40 वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.
 
पोलादपूर तालुक्यात चार-पाच वर्षांपूर्वी कशेडी घाट, आंबेनळी घाट परिसरामध्ये अनेक बेवारस अज्ञात मृतदेह आढळून आले होते. यापैकी काही मृतदेहांचा तपास अर्ध्यावर रखडला तर काही अज्ञात मृतदेहांची ओळख पटल्यानंतर तो खून असल्याचेही निष्पन्न झाले होते. त्यामुळे या दोन अज्ञात मृतदेह आढळण्याच्या घटनांनंतर पोलादपूर पोलिसांसमोर तपासाचे कडवे आव्हान उभे राहिले आहे.