माणगाव : दुचाकी अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

By Raigad Times    02-Mar-2021
Total Views |
Mangaon Accident News_1&n
 
भोईर कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
 
सलीम शेख/माणगाव : माणगाव-मोर्बा रस्त्यावर दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रविण रविंद्र भोईर या तरुणाचा रविवारी (28 फेब्रुवारी) उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने भोईर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून तो राहत असलेल्या जुने माणगावमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
प्रविण भोईर (वय 40) हे 26 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरुन माणगाव मोर्बा रस्त्याने चालले होते. याचदरम्यान समोरुन येणार्‍या दुचाकीशी धडक होऊन झालेल्या अपघातात प्रविण भोईर यांना गंभीर दुखापत होऊन रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. त्यांची गंभीर अवस्था पाहून माणगावमधील डॉक्टरांनी त्यांना मुंबईला हलविण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे प्रविण भोईर यांना मुंबई येथील सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
 
औषधोपचार सुरु असताना रविवारी प्रविण भोईर यांचा रविवारी मृत्यू झाला. त्यांच्या निधनाची माहिती माणगावात समजताच त्यांच्या जुने माणगाव भागातील संगमेश्वर नगर निवासस्थानी ग्रामस्थांनी धाव घेतली. सोमवारी (1 मार्च) सायंकाळी त्यांचे पार्थिव माणगावात निवासस्थानी आणण्यात आले आणि रात्री शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, प्रविण भोईर (वय-40) यांच्या पश्‍चात पत्नी, चार मुली, एक दोन वर्षांचा मुलगा, दोन भाऊ, वहिनी असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, जुने माणगाव परिसरात शोककळा पसरली आहे.