कर्जत : माले येथील बंद घर फोडले

By Raigad Times    02-Mar-2021
Total Views |
कर्जत : माले येथील बंद घर
 
अडिच लाखांचे दागिने चोरीला; गुन्हा दाखल
 
कर्जत । कर्जत तालुक्यातील सालोख ग्रामपंचायत हद्दीतील माले गावात एका बंद घरात घुसून चोरट्यांनी घरफोडी केली. साधारण अडिच लाखांचे सोने या चोरांनी लंपास केले आहे. याप्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
माले या गावात संतोष गणपत भुंडेरे यांचे घर असून ते नोकरीच्या निमित्ताने नेरळ गावात राहतात. 26 फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वाजता माले येथील गावातून संतोष भुंडेरे नेरळ येथील धामोते भागात असलेल्या आपल्या घरी आले होते. 27 फेब्रुवारी रोजी सकाळी ते पुन्हा आपल्या घरी माले येथे सकाळी साडेआठ वाजता पोहचले असता त्यांना घरात कोणी अज्ञात लोक घुसले असल्याचा संशय आला.
 
घरातील वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या असल्याने त्यांनी शोध घेतला असता घरातील बेडरूममध्ये असलेल्या लोखंडी कपाटाचे दोन्ही दरवाजे उघडे होते आणि त्या कपाटामधील लॉकर फोडून त्यातील दागिने लंपास करण्यात आले होते. त्यामुळे संतोष भुंडेरे यांनी नेरळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन चोरीची तक्रार दाखल केली.
 
भुंडेरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या लोखंडी कपाटातून 37.50 गॅम वजनाचे सोन्याचे गंथन, 32 हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी, 11 ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार, साडेपाच गॅ्रम वजनाचे सोन्याचे कानातील झुमके, अडीच गॅ्रम वजनाची सोन्याची नथ, शिंपले आणि चांदीची पायातील पैंजण, असे साधारण अडीच लाख रुपयांचे दागिने चोरीला गेले आहेत.
 
तक्रार दाखल झाल्यानंतर जिल्हा पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी घरफोडी, चोरीचा गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर करीत आहेत.