अलिबाग नगरपरिषदेचा 44.76 कोटींचा अर्थसंकल्प

By Raigad Times    02-Mar-2021
Total Views |
alibag nagar parishad_1&n 
 
कोणतीही करवाढ नाही; नागरिकांना दिलासा
  • शहराच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही लावणार; 6 कोटी रुपयांची विशेष तरतूद
  • आंग्रे समाधीच्या ठिकाणी ‘लाईट अँड साऊंड शो’साठी 5 कोटींची तरतूद  
  • अलिबाग कोळीवाडा, ब्राह्मणआळीमध्ये पाणी साठवण टाकी बांधणार
  • नैसर्गिक आपत्तीकरिता अर्थसंकल्पात विशेष तरतूद
अलिबाग । अलिबाग नगरपरिषदेच्या सन 2021-2021 च्या सुधारीत आणि 2021-22 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाचे अंदाजपत्रक नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या विशेष सभेमध्ये मंजूर करण्यात आहे. सदर अर्थसंकल्प 44 कोटी 76 लाख रुपयांचा असून कोणतीही करवाढ न करत नागरिकांना दिलासा देण्यात आला आहे.
 
सोमवारी (1 मार्च) झालेल्या या अर्थसंकल्पीय सभेस नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्यासमवेत उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे, गटनेते प्रदीप नाईक, नगरपरिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद वाकडे, सर्व विषय समित्यांचे सभापती, सर्व नगरसेवक उपस्थित होते.
 
कोरोना काळात पालिकेचे उत्पन्न घटलेले असताना तसेच शहरातील पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता पाणी, रस्ते आणि आरोग्य या घटकांवर विशेष भर या अर्थसंकल्पात देण्यात आला आहे. शहरातील मागासवर्गीय, अपंग, महिला व बालक यांचे जीवनमान सुधारणे, शहराचे सुशोभीकरण, नमिता नाईक क्रीडा संकुलाची उभारणी, शहरातील मुख्य रस्ते स्वच्छ करणे, उर्दू शाळेसाठी विशेष तरतूद, रायवाडी उद्यान यासारख्या विविध विकासात्मक बाबींवर सविस्तर चर्चा करून अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली.
 
सदर अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात महसुली, भांडवली तसेच इतर उत्पन्नातून 44.76 कोटी उत्पन्न अपेक्षित धरले असून त्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण कामाचे अनुदान, जिल्हा नगरोत्थान, 15 वा वित्त आयोग यातून निधी अपेक्षित आहे. खर्चाच्या बाजूचा विचार करता शहरातील आवश्यक त्या सर्व कामांचा समावेश करण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आला आहे.
 
आरोग्य सुविधा तसेच नैसर्गिक आपत्तीकरिता अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे. शहराच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही लावण्यात येणार असून यावर्षीच्या अर्थसंकल्पात त्याकरिता सहा कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे. तसेच पर्यटकांचे आकर्षण असणार्‍या आंग्रे समाधीच्या ठिकाणी ‘लाईट अँड साऊंड शो’साठी 5 कोटींची तरतूद करण्यात आली अहे. नवीन रस्त्यांकरिता 1 कोटी 35 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी अर्थसंकल्पात 1 कोटी 20 लाखांची तरतूद केली असल्याचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी सांगितले.
 
शहरातील पाणीपुरवठा योजनावर मोठा खर्च होत असून त्यामानाने पाणीकराच्या रुपाने मिळणारे उत्पन्न तुटपुंजे आहे. तरीही नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि त्यातून योग्य पाणीपुरवठा व्हावा या दृष्टीकोनातून अलिबाग कोळीवाडा आणि ब्राह्मणआळीमध्ये स्वतंत्र पाणी साठवण्यासाठी टाकी बांधण्यात येणार आहे. त्यामुळे पाण्याचा तुटवडा राहणार नाही, असा विश्वास नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी व्यक्त केला.
 
दुर्बल घटकांकरिता 40 लाखांची तर अंध-अपंग नागरिकांसाठी 24 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. महिला बालकल्याण विभागासाठी स्वतंत्र 40 लाखांची तरतूद करण्यात आली असून रायवाडी विभागातील गार्डनचे काम पूर्ण करुन या आर्थिक वर्षात नागरिकांसाठी ते खुले करण्यात येणार आहे. उर्दू शाळेच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी 70 लाखांची तरतूद करण्यात आली असून मुस्लिम समाजभवनासाठीही विशेष तरतूद करण्यात आली असल्याची माहिती नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी दिली.
 
बौध्द समाज तसेच कोळी समाजाकरित असलेली स्मशानभूमी अद्ययावत करून त्याठिकाणी आवश्यक त्या सर्व सुधारणा करण्यात येतील, याबरोबरच रामनाथ येथील स्मशानभूमीही विकसित करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. सिध्दार्थनगरमध्ये वाल्मिकी समाज मंदिराची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आलेली आहे.
 
अलिबाग बाजारपेठेमध्ये मीनाबाजारची जुनी इमारत पाडून त्याठिकाणी अद्ययावत शॉपिंग कॉम्प्लेक्स करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याचे काम लवकरच सुरु करण्यात येणार आहे. मागील 5 वर्षात शहरातील नागरिकांवर पाणीपट्टी, घरपट्टीच्या माध्यमातून कोणतीही दरवाढ न करता शहराच्या विकासाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात आलाा आहे.
 
दरम्यान, अलिबाग नगरपरिषदेचा एकूण 44 कोटी 76 लाखांचा अर्थसंकल्प एकमताने मंजूर करण्यात आला असून या अर्थसंकल्पामुळे शहराच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास सर्व नगरसेवकांनी व्यक्त केला.